

माणिक पवार
नसरापूर : किकवी येथील शनिवारच्या गुरांच्या बाजारावर पहिल्यांदाच कमी प्रमाणात गुरे विक्रीला आली होती. पावसाने डोळे वटारल्यामुळे शेतकर्यांनी या बाजाराकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. सध्या शेतीची कामे सुरू असल्याने शेतकर्यांनी शेतातच राहणे पसंत केले. परिणामी, बाजारात मंदीचे चित्र होते. किकवी (ता. भोर) येथील बाजार समितीच्या वतीने शनिवारी (दि. 25) नेहमीप्रमाणे गुरांचा बाजार भरविण्यात आला. बाजारात गावरान बैल, खिल्लारी, म्हसुरी, खोंड, एचएफ व जर्शी गायी अशी जवळपास 100 गुरांची आवक होती. म्हशी व शेळ्या-मेंढ्यांची आवक नगण्य होती.
ज्या गरजू शेतकर्यांना पैशांची आवश्यकता होती अशांनीच जनावरे विक्रीसाठी आणली होती. गुरांचे साहित्य विकणार्यांच्या व्यवसायांवरही विपरीत परिणाम दिसून आला. महिन्यापासून पाऊस गायब झाला आहे. रिमझिम पाऊस वगळता कुठेही मुसळधार पाऊस नाही. काही भागांत पिके तरारलेली असली, तरी बहुतांश भागांत पाण्याअभावी पिके पिवळी पडत आहेत. अशा परिस्थितीत गुरांच्या बाजाराकडे शेतकर्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे आजच्या बाजारात गुरांची तुरळक आवक दिसून आली. निम्म्याहून अधिक प्रमाणात गुरांची आवक घटली असून, बाजारात आर्थिक उलाढाल कमी झाल्याची माहिती बाजार समितीचे सहसचिव किरण घारे व पाहणी निरीक्षक चंद्रकांत साळेकर यांनी दिली.
पावसाची परिस्थिती, शेतीची सुरू असलेली कामे, दुबार पेरणीचे संकट, अशा अनेक कारणांमुळे गुरांच्या खरेदी-विक्रीवर परिणाम होत आहे. शेतकरी आणि व्यापार्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.
– दत्तात्रय भिलारे, गुरांचे व्यापारी
हेही वाचा