

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : सीएसएमटी स्थानकात मध्य रेल्वेवरील पहिले रेस्टॉरंट ऑन व्हील सुरू करण्यात आले आहे. या रेस्टॉरंट ऑन व्हीलला प्रवाशांसह पर्यटकांनीदेखील पसंती दिली आहे. गेल्या आठ महिन्यांत येथे 60 हजार प्रवासी आणि पर्यटकांनी भेट देऊन एका आगळ्यावेगळ्या वातावरणात खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.
सीएसएमटी स्थानकात येणार्या-जाणार्या प्रवाशांना आणि पर्यटकांना रेल्वेच्या डब्यात बसूनच खाद्यपदार्थांची चव चाखण्यासाठी रेस्टॉरंट ऑन व्हील संकल्पना राबविली आहे. वापरात नसलेल्या डब्यांचे रुपांतर उपाहारगृहात करून सीएसएमटीच्या 18 नंबर प्लॅटफॉर्मबाहेर 18 ऑक्टोबर 2021 पासून रेस्टॉरंट ऑन व्हील सुरू केले आहे. बोगी-वोगी असे नाव दिलेल्या या रेस्टॉरंट ऑन व्हीलला दररोज सुमारे 200 ते 300 प्रवासी, पर्यटक भेट देतात.
शनिवार-रविवारी खवय्यांची संख्या 500 पर्यंत जाते. स्थानकात येणार्या पर्यटक, प्रवाशांना बसून खाद्यपदार्थांचा आनंद घेता यावा यासाठी विविध रेल्वे स्थानकांत रेस्टॉरंट ऑन व्हील उभारण्यात येत आहेत. नागपूर स्थानकाच्या बाहेर वापरात नसलेल्या एका कोचला सजवून त्यांचे रुपांतर 3 फेब्रुवारी 2022 पासून रेस्टॉरंट ऑन व्हीलमध्ये केले आहे. येथे आतापर्यंत 30 हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. यातून रेल्वेला वार्षिक उत्पन्न देखील मिळते.
या स्थानकांत होणार रेस्टॉरंट ऑन व्हील
सीएसएमटी स्थानकांनतर एलटीटी, नेरळ, लोणावळा आणि इगतपुरी तसेच पुणे विभागातील आकुर्डी, बारामती, चिंचवड आणि मिरज स्थानकांवर रेस्टॉरंट ऑन व्हील संकल्पना राबविण्यात येणार आहे.