काँग्रेसला आता आघाडी हवीय; स्वबळावर लढल्यास अडचणीत वाढ

पाचगाव ग्रामपंचायत
पाचगाव ग्रामपंचायत

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : काँग्रेसने निवडणुकीत आघाडी केल्यास त्यांच्या जागा वाढू शकतील. नगरसेवक व उमेदवारी मिळण्याची शक्यता असलेले कार्यकर्ते आघाडीसाठी अनुकूल आहेत. काँग्रेस सध्या स्वबळावर लढण्याची तयारी करीत असला, तरी स्थानिक पातळीवर आघाडी करण्याबाबतही त्यांची चाचपणी सुरू आहे.

पुणे कॅन्टोंन्मेट, कसबा पेठ आणि शिवाजीनगर या मतदारसंघांत काँग्रेसची ताकद आहे. पर्वती, कोथरूड, हडपसर, वडगाव शेरी या मतदारसंघांतील काही प्रभागांत त्यांचे माजी नगरसेवक व प्रमुख कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्या ठिकाणी महाआघाडीत स्थान मिळाल्यास ते एकत्रितरीत्या भाजपला तोंड देऊ शकतील, अशी स्थिती आहे.

गेल्या निवडणुकीत चार सदस्यांच्या प्रभागात काँग्रेसचे केवळ दहा जण निवडून आले होते. त्या दहांपैकी सात जण पुणे कँन्टोन्मेंट मतदारसंघातून महापालिकेत पोहोचले होते. या मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या काही जणांनी पक्षविरोधी काम केल्याने काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे पाच हजार मतांनी पराभूत झाले.

त्या वेळी वंचित विकास आघाडी आणि एमआयएमच्या उमेदवारांना एकूण सोळा हजार मते मिळाली होती. त्यामुळे येथे काँग्रेसची किमान तीन प्रभागांत चांगली स्थिती राहील. मात्र, आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सामावून घेताना, काँग्रेसला एखादी जागा सोडून द्यावी लागेल. काँग्रेसचे अरविंद शिंदे आणि राष्ट्रवादीचे प्रदीप गायकवाड हे दोन्ही माजी नगरसेवक पुणे रेल्वेस्टेशन या एकाच प्रभागातून निवडून आले होते.

त्या प्रभागातून गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे तीन आणि राष्ट्रवादीचा एक, असे चौघे निवडून आले होते. राष्ट्रवादीने महिलांसाठीची एक जागा घेतल्यास तेथे आघाडीची पॅनेल निवडून येऊ शकतो. काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांच्या प्रभागातही तशीच स्थिती आहे. या दोन्ही प्रभागांत मुस्लिम समाजाचे दोघे काँग्रेसतर्फे निवडून आले होते. त्यांनाही उमेदवारी द्यावी लागेल. याचा सकारात्मक परिणाम लगतच्या दोन-तीन प्रभागांवर पडणार आहे. तेथील काँग्रेस उमेदवारांना याचा फायदा होईल.

कसबा पेठेतील प्रभागात रवींद्र धंगेकर यांनी भाजपसमोर आव्हान उभे केले आहे. आघाडी झाल्यास तेथील दोन प्रभागांत अटीतटीच्या लढती होतील. आघाडी झाली नाही, तर येथे सर्वत्र काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादीतील मतविभागणीचा फायदा विरोधकांना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिवाजीनगर मतदारसंघात गेल्या वेळी महापालिकेच्या सर्व जागा भाजपने जिंकल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत भाजपचे सिद्धार्थ शिरोळे यांनी काँग्रेसचे दत्ता बहिरट यांचा पाच हजार मताधिक्याने पराभव केला होता. भाजपचे मताधिक्य घटले. या वेळी बहिरट, मनीष आनंद, तसेच आणखी काही कार्यकर्ते काँग्रेसकडून चांगली लढत देण्याची शक्यता आहे.

पर्वती मतदारसंघातून आबा बागूल हे काँग्रेसचे एकमेव नगरसेवक होते. आघाडी झाल्यास पर्वतीमध्ये प्रभाग 37 (जनता वसाहत – दत्तवाडी), प्रभाग 38 (शिवदर्शन पद्मावती), प्रभाग 50 (सहकारनगर तळजाई) या तीन ठिकाणी ते जोरदार मुसंडी मारू शकतील. गेल्या निवडणुकीत पर्वती मतदारसंघातील आघाडीचे तीन नगरसेवक याच भागातून निवडून आले होते.

कोथरूड मतदारसंघात चंदूशेठ कदम आणि वैशाली मराठे हे दोघे काँग्रेसचे नगरसेवक असून, त्याच प्रभागातून गेल्या वेळी राष्ट्रवादीचे दीपक मानकर निवडून आले होते. तेथे झालेल्या प्रभागात दोन सर्वसाधारण जागा आहेत. त्यामुळे तेथे तिन्ही पक्षांमध्ये अपेक्षेनुसार जागावाटप झाल्यास, तेथील तीन प्रभागांत आघाडी मोठे आव्हान उभे करीत भाजपच्या काही जागा खेचून घेऊ शकेल. आघाडी न झाल्यास, आपापसांत होणार्‍या लढतीत तिन्ही पक्षांचे नुकसान होईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news