ऑनलाईन हत्यारांवर वॉच कोणाचा; घातक शस्त्रांची शहरात राजरोसपणे विक्री

ऑनलाईन हत्यारांवर वॉच कोणाचा; घातक शस्त्रांची शहरात राजरोसपणे विक्री
Published on
Updated on

संतोष शिंदे

पिंपरी : मागील काही वर्षांपासून घातक शस्त्रांचे ऑनलाईन मार्केट तेजीत आहे. गुन्हेगारांना धारदार तलवारींसह, चाकू, कुकरी, कोयता, कुर्‍हाड आदी शस्त्र घरपोच मिळत आहे. सहज उपलब्ध होणार्‍या या शस्त्रांमुळे गंभीर गुन्ह्यांत वाढ होण्याची भीती वर्तवली जात आहे. यातील विशेष बाब म्हणजे राजरोसपणे सुरू असलेल्या या ऑनलाईन गोरखधंद्यावर कोणाचाही अंकुश किंवा वॉच नाही.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे देखील एका कुरिअर कंपनीत तलवारींची मोठा साठा मिळून आला होता. त्यानंतर दिघी पोलिसांनी कुरियरने मागविलेल्या 97 तलवारी, 2 कुकरी, 9 म्यान, असा मोठा शस्त्रसाठा जप्त केला. या प्रकरणात उमेश सुद (रा. अमृतसर, पंजाब), अनिल होन (रा. औरंगाबाद), मनिंदर (रा. अमृतसर, पंजाब), आकाश पाटील (रा. चितली, ता. राहता, जि. अहमदनगर) यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली होती.

या कारवाईनंतर ऑनलाईन मिळणार्‍या घातक शस्त्रांचा मुद्दा समोर आला. मात्र, यंत्रणा त्यावर अद्यापपर्यंत कोणताही अंकुश लावू शकल्या नाहीत. आजही गुगलवर ऑनलाईन शस्त्र खरेदीसाठी सर्च केल्यास ढीगभर साईटस संपर्क क्रमांकासहीत समोर येतात. राज्याबाहेरील कोणत्यातरी कोपर्‍यात बसून ही मंडळी शस्त्रांचा देशभर पुरवठा करीत आहेत. एक- दोन हत्यारे पॅकिंगमध्ये कुरियर होत असल्याने पोलिसांना आणि कुरियर कंपन्यांना याची कानोकान खबर लागत नाही.

दरम्यान, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांनी सर्व कुरिअर कंपन्यांना पार्सलचे काळजीपूर्वक स्कॅनिंग करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, काही दिवस मोठा शस्त्रसाठा असल्यास कुरिअर कंपन्यानी पोलिसांना खबर दिली. मात्र, त्यांनी देखील व्यावसायिक गणित असल्याने मौन धारण केल्याचे दिसून येत आहे. परिणामी पिंपरी- चिंचवडसह राज्यात घातक शस्त्रांची ऑनलाईन विक्री राजरोसपणे सुरूच आहे.

नियमांना केराची टोपली

भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4 अंतर्गत 9 इंचीपेक्षा लांब आणि 2 इंचीपेक्षा रुंद शस्त्र बाळगणे गुन्हा आहे. मात्र, ऑनलाईनवर कंपन्या नियमांच्या विरोधात जाऊन हत्यारांची विक्री करीत आहे. त्यामुळे अशा कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करून चाप लावण्याची गरज आहे.

प्रायव्हसीच्या नावाखाली लपवा-छपवी

नऊ इंचापेक्षा लांब आणि 2 इंचीपेक्षा रुंद असलेले शस्त्र खरेदी करणार्‍या ग्राहकांची संपूर्ण माहिती कंपन्यांनी पोलिसांना देणे बंधनकारक आहे. खरेदीदाराचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, कोणत्या प्रकारचे शस्त्र, कधी खरेदी केले, त्याची होम डिलिव्हरी कधी झाली, त्याची सचित्र माहिती पोलिसांना देणे अपेक्षित आहे. मात्र, बहुतांश कंपन्या ग्राहकांच्या प्रायव्हसीच्या नावाखाली ही माहिती लपवत असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई सुरू असते. ऑनलाईन कंपन्या जर भारतीय हत्यार कायद्याचे उल्लंघन करीत असल्यास त्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. दरम्यान, ऑनलाईन हत्यारांची खरेदी- विक्री रोखण्यासाठी शहरातील कुरियर कंपन्यांना नोटिस देखील देण्यात आली आहे.

                              – मंचक इप्पर, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news