उन्हाच्या झळा : अन्न-पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी मानवी वस्तीकडे..!

उन्हाच्या झळा : अन्न-पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी मानवी वस्तीकडे..!

मंचर : पुढारी वृत्तसेवा : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने जंगलात अन्न-पाणी मिळत नसून, अनेक वन्यप्राणी मानवी वस्तीमध्ये येताना दिसत आहेत. पुणे-नाशिक महामार्गावरील अवसरी खुर्द-मंचरजवळील तांबडेमळा येथे पाण्याच्या शोधात भटकंती करताना काळवीट भटकत होते, तर निरगुडसर येथे गेल्या काही दिवसांपासून अन्न-पाण्याच्या शोधात काही वानरे भटकत आहेत. वन विभागाने वन्य प्राण्यांसाठी पाणवठे तयार करावेत, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

यंदाच्या वर्षी उन्हाळा कडक जाणवत आहे. त्यातच मागील वर्षी पावसाळ्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जंगलातील पाणवठे म्हणावे असे पाण्याने भरले नाहीत. तसेच जंगलात असणारे गवत, कंदमुळे, फळे-फुलांची कमतरता भासत असल्याने वन्यप्राणी अन्न-पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे येत आहेत. तांबडेमळा येथे माळरानावर काळवीट अन्न-पाण्यासाठी सैरावैरा पळत असताना शेतकर्‍यांना दिसले.

तर निरगुडसर, मेंगडेवाडी परिसरातही गेल्या काही दिवसांपासून अन्न-पाण्याच्या शोधात दोन वानर फिरत आहेत. ही वानरे अनेकांच्या घरावर जाऊन बसत आहेत. त्यांना गावातील लोकही अन्न-पाणी देत आहेत. या अगोदरही तांबडेमळ्यात हरणांबरोबरच कोल्हे, लांडगे, तरस, मोर, वानर, खवले मांजर, रानमांजर असे विविध प्राणी मानवीवस्तीत आढळून आले आहेत. गावाजवळूनच पुणे-नाशिक महामार्ग जात असून, वन्यप्राण्यांचे महामार्गावर येऊन अपघात होण्याची शक्यता आहे. वन विभागाने वन्यप्राण्यांसाठी अन्न-पाण्याची सोय करावी, अशी मागणी तांबडेमळा येथील सरपंच प्राजक्ता विजय तांबडे यांनी केली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news