उज्ज्वल योजनेचा लाभ दीड लाख लाभार्थ्यांना

उज्ज्वल योजनेचा लाभ दीड लाख लाभार्थ्यांना

पुणे, पुढारी वृत्तसेवा: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये सुरू केलेल्या उज्ज्वला योजने अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले. पुणे जिल्ह्यात एक लाख 47 हजार 660 कुटुंबाकडे उज्ज्वला गॅस सिलिंडर असून, त्यांना आता सिलिंडर 200 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत सिलिंडर आणि गॅस शेगडी मिळाली.

सुरुवातीला त्यांनी काही सिलिंडर रिफिल करून घेतले. त्या दरम्यान मिळणारे अनुदान बंद झाले. त्यामुळे सिलिंडरचे दर आवाक्याबाहेर गेले. परिणामी सिलिंडर रिफिल करण्याचे प्रमाण कमी होत गेले. ग्रामीण भागातील महिला स्वयंपाकासाठी पुन्हा चुलीकडे वळल्या. केंद्र सरकारने उज्ज्वला गॅस योजनेतंर्गत सिलिंडरवर 200 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली.

रिफीलचे प्रमाण वाढण्याची शक्यता

गॅस सिलिंडरवरील मिळणारे अनुदान बंद झाले. त्याचा परिणाम उज्ज्वला गॅस सिलिंडर योजनेतील सिलिंडर रिफिल करण्यावर झाला आहे. परंतु आता 200 रुपये कमी किमतीने सिलिंडर मिळत असल्याने रिफीलचे प्रमाण वाढेल, अशी अपेक्षा अधिकार्‍यांनी व्यक्त केली.

हवेली तालुक्यात सर्वाधिक लाभार्थी

जिल्ह्यातील सर्व 13 तालुक्यांमध्ये तीन कंपन्यांमार्फत उज्ज्वला योजनेखाली गॅस सिलिंडर पुरवले जातात. योजनेचे हवेली तालुक्यात सर्वाधिक 32,145 लाभार्थी आहेत. त्यापाठोपाठ इंदापूरमध्ये 23,206, जुन्नर 14,748, बारामती 12,736, आंबेगाव 11,462, दौंड 11,245, जुन्नर 10,251, शिरूर 9,253, पुरंदर 9,050, भोर 5,521, मावळ 5,653, वेल्हा 1,247 आणि मुळशी तालुक्यात 1,143 लाभार्थी आहेत.

हेही वाचा 

logo
Pudhari News
pudhari.news