फेक अ‍ॅपद्वारे टाकळी हाजीतील तरुणांना लाखोंचा गंडा

फेक अ‍ॅपद्वारे टाकळी हाजीतील तरुणांना लाखोंचा गंडा

टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा :  वेगवेगळ्या अ‍ॅपच्या माध्यमातून झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाला तरुणाई बळी पडत आहेत. ऑनलाइन जुगार, वेगवेगळ्या गेम्स किंवा गुंतवणुकीतून जादा मोबदला सांगणारे शेकडो फेक अ‍ॅप डाऊनलोड करण्याच्या नादात अनेकांना लाखो रुपयांचा गंडा बसत आहे. टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील काही तरुणांबाबतदेखील घडलेला असाच फसवणुकीचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या अ‍ॅपमध्ये एकदाच पैसे गुंतवा आणि 35 दिवस दररोज परतावा मिळवा, अशी ऑफर देणारी एक लिंक टाकळी हाजीतील काही तरुणांना इंटरनेटवरून मिळाली होती.

अ‍ॅपद्वारे मिळणारी रक्कम ही गुंतवणुकीच्या जवळपास 15 पट इतकी असल्याने अनेकांनी मोबाईलमध्ये संबंधित अ‍ॅप डाउनलोड केले. तसेच त्यात 600 रुपयांपासून 78 हजार रुपये गुंतविले. पहिल्यांदा गुंतवणूक करताच 500 ते 800 रुपयांपर्यंतची रक्कम त्याच दिवशी काहींना परत मिळाली. त्यामुळे रक्कम मिळते याची खात्री झाली. मात्र, दुसर्‍या दिवसांपासून रक्कम मिळालीच नाही. तेव्हा आपली फसवणूक होत असल्याची या तरुणांनी खात्री झाली.

रक्कम येईल अशा आशेवर दररोज वाट पाहून निराशा पदरी आल्यानंतर अखेर तरुणांनी टाकळी हाजी पोलिस ठाण्याची वाट धरली. कष्ट करून कमावलेला पैसा बँकेत बचत करा. फसव्या आमिषाला बळी पडू नका. ज्यांची फसवणूक झाली असेल अशा लोकांनी सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करा, असे आवाहन टाकळी हाजीचे पोलिस उपनिरीक्षक सुनील उगले यांनी केले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news