

इंदापूर : क्रिकेट खेळत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ३२ वर्षीय तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २५) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास इंदापूर बाह्यवळण मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला गलांडवाडी नंबर दोन गावच्या हद्दीत घडली. किरण युवराज चव्हाण (वय ३२, रा. सरडेवाडी जाधव वस्ती, ता. इंदापूर) असे या तरुणाचे नाव आहे.
याबाबत विठ्ठल अजिनाथ महाडिक (रा. सरडेवाडी जाधव वस्ती, ता. इंदापुर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मावस भाऊ किरण चव्हाण हा शुक्रवारी सायंकाळी इंदापुर बायपास येथील मार्केट यार्डच्या बाजूला पटांगणात मित्रांबरोबर क्रिकेट खेळत होता. यावेळी अचानक किरणच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने उपचारासाठी इंदापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी किरणला पुढील उपचारासाठी इंदापुर येथील उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. उपजिल्हा रुग्णालयात त्याला नेले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.