

गडचिरोली : भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने दोन युवक जागीच ठार झाले. ही घटना मंगळवारी (दि.२२) दुपारी १२ च्या सुमारास कढोली-गांगोली मार्गावरील खवल्या देवस्थानाजवळ घडली. प्रज्वल प्रल्हाद आलाम (वय २५) व वैष्णव गुणाजी उईके (वय २२, दोघेही रा.नरचुली,ता.आरमोरी) अशी मृतांची नावे आहेत.
प्रज्वल व वैष्णव हे दोन मित्र नरचुली येथून कुरखेडा तालुक्यातील पळसगाव येथील प्रज्वलच्या बहिणीला भेटण्यास जात होते. गांगोली गावानजीकच्या खवल्या देवस्थानाजवळ पोहचताच छत्तीसगडहून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने पलायन केले. मात्र, वैरागड येथील नागरिकांनी ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. सहायक पोलिस निरीक्षक प्रियंका आघाव यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. या घटनेत दोन होतकरु युवकांचा मृत्यू झाल्याने नरचुली व कुरखेडा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.