

येरवडा: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, येरवडा परिसरात बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. कुंभारवाड्यात गणेशमूर्तीवर शेवटचा हात फिरवताना, रंगरंगोटी करताना कारागिरांची धावपळ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा महागाईची झळ बसत असली, तरी बाप्पाच्या आगमनाचा उत्साह थोडाही कमी झाला नसल्याचे चित्र आहे.
पुण्याच्या पूर्व भागात गेल्या पाच पिढ्यांपासून गणेश मूर्ती घडवण्याची परंपरा जपणारे एक कुटुंब येरवड्यात आहे. या परंपरेची चौथी पिढी जितेंद्र कुंभार हे आजही जातीने मूर्ती घडवतात, तर त्यांच्यासोबत आता पाचवी पिढी संकेत कुंभार आणि अनिकेत कुंभार ही परंपरा समर्थपणे पुढे नेत आहेत. मातीला आकार देताना केवळ व्यवसाय नाही तर भक्ती आणि परंपरेचा वारसा जपण्याची भावना त्यांच्या कामात दिसून येते.
यंदा मूर्तिकारांसमोर महागाईचे मोठे आव्हान उभे आहे. आखातातील युद्ध परिस्थितीमुळे मूर्तीसाठी लागणारा कच्चा माल, रंग, ब्रश, पीओपी यांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्चही दुप्पट झाला आहे. 'गेल्या वर्षी २६० रुपयांना मिळणारी रंगाची बॉटल यंदा थेट ३४० रुपयांना घ्यावी लागत आहे. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला यंदा मूर्तीच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ करावी लागली आहे,' असे मूर्तिकार जितेंद्र कुंभार यांनी सांगितले. दर वाढले असले तरी गणेशभक्तांचा उत्साह आणि मागणी मात्र तसूभरही कमी झालेली नाही.
मूर्तिकार संकेत कुंभार म्हणाले, 'पर्यावरणपूरक गणेशोत्सवाकडे कल वाढत असला तरी मागणीनुसार दोन्ही प्रकारच्या मूर्ती तयार केल्या जातात. 'शाडू मातीची मूर्ती वजनाने जड असते आणि ती तयार करण्यासाठी जास्त वेळ आणि मेहनत लागते. दिवसभरात शाडूच्या ३ ते ४ मूर्ती तयार होतात. तर त्याच वेळेत पीओपीच्या २५ ते ३० मूर्ती सहज तयार होतात. पीओपीची मूर्ती हलकी असल्याने वाहतुकीला सोपी जाते.'
काय आहे ट्रेंडमध्ये?
यंदा बाप्पांच्या मूर्तीचा ट्रेंड काहीसा वेगळा आहे. बाजारात पुणेरी पगडी घातलेल्या मूर्तींना सर्वाधिक मागणी आहे. त्याचबरोबर महादेवाच्या अवतारातील गणपती, श्रीराम रूपातील बाप्पा, स्वामी समर्थांच्या रूपातील मूर्ती तसेच पुण्याचे ग्रामदैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि मुंबईच्या लालबागचा राजा यांच्या प्रतिकृतींना गणेश मंडळे आणि घरगुती गणेश भक्तांकडून मोठी पसंती मिळत आहे.