

पिंपरखेड: राष्ट्रीय पुस्तक ट्रस्ट (एनबीटी), शिक्षण मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेल्या पुणे पुस्तक महोत्सव 2025 च्या पार्श्वभूमीवर वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी शिक्षणाधिकारी यांच्या आदेशानुसार श्रीदत्त विद्यालयात ’शांतता... पुणेकर वाचत आहेत’ हा विशेष उपक्रम उत्साहात व कल्पकतेने राबविण्यात आला.
यावर्षी पुणे पुस्तक महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून, 13 डिसेंबर ते 21 डिसेंबर 2025 या कालावधीत पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज मैदानावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून वाचनसंस्कृतीच्या प्रसारात या महोत्सवाने मोलाची भूमिका बजावली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व माध्यमांतील शाळाड्ढमहाविद्यालयांनी या उपक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन शिक्षणाधिकाऱ्यांकडून करण्यात आले होते.
त्या आदेशानुसार मंगळवार, दि. 9 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत श्रीदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपरखेड येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून पुस्तकाची आकर्षक व भव्य प्रतिकृती साकारत वाचनसंस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले.