पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बंद

पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बंद
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सांस्कृतिक संस्थासह कलाकारांना नाट्यगृहांसाठी अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कारण, महापालिकेचे सर्वाधिक मागणी असलेले कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह एसी यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी जवळपास 40 दिवस बंद राहणार असून, 6 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत दुरुस्तीचे काम चालणार आहे. त्यामुळेच महिनाभर रसिकांना सांस्कृतिक कार्यक्रमांना मुकावे लागणार आहे. एकीकडे संस्थासह कलाकारांची गैरसोय होणार आहे.

पण, दुसरीकडे उशिरा का होईना, एसी यंत्रणेची दुरुस्ती होणार कलाकारांनी समाधान व्यक्त केले आहे. महापालिकेच्या नाट्यगृहातील समस्या तशा नव्या नाहीत… पण, सध्या पालिकेच्या 14 नाट्यगृहांमध्ये टप्प्याटप्प्याने दुरुस्तीचे काम केले जात आहे. परंतु, त्यात आता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह 40 दिवस बंद राहणार असून, या काळात नाट्यगृहात बुकिंग झालेले सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाट्यप्रयोगही रद्द करण्यात येणार आहेत. त्यात बालगंधर्व रंगमंदिर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह आणि गणेश कला क्रीडा मंच या नाट्यगृहांच्या ऑगस्टपर्यंतच्या तारखाही बुक असल्याने आणि त्यात आता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बंद राहणार असल्याने संस्थांसह कलाकारांपुढे नाट्यगृहांंसाठीचा प्रश्न उभा राहिला असून, नाट्यगृहांचा दुष्काळ त्यांना अनुभवावा लागणार आहे.

सर्वाधिक मागणी असलेले नाट्यगृहच राहणार बंद…
कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कार्यक्रम, प्रयोग करण्यासाठी संस्थांसह कलाकारांसाठी मोठी मागणी असते. एप्रिल 2022 चे मार्च 2023 या वर्षभरात महापालिकेला या नाट्यगृहातून सुमारे 40 लाख 52 हजार 759 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सध्या या नाट्यगृहात महिन्याला किमान 50 ते 70 कार्यक्रम या नाट्यगृहात होत असून, नाट्यगृहाचे ऑगस्टपर्यंतचे बुकिंगही झाले आहे. असे असतानाही गेल्या काही महिन्यांपासून नाट्यगृहातील एसी यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे कलाकारांना प्रयोग करताना उकाडा सहन करावा लागत होता.

एसीच्या यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे कलाकारांसह रसिकांना उकाडा सहन करावा लागला. कलाकारांनी सातत्याने तक्रार केल्यामुळे एसी तात्पुरता दुरुस्त करण्यात आला होता. परंतु एसीची यंत्रणा पूर्णपणे बदलावी, अशी कलाकारांची मागणी होती. या मागणीची दखल
घेतली गेल्यामुळे कलाकारांनी समाधान व्यक्त केले आहे.

सध्या नाट्यगृहांमधील दुरुस्तीचे काम टप्प्याटप्प्याने केले जात आहे. त्यामुळे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह एसी यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी 40 दिवस बंद राहणार आहे. एसी यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर व्हावे, याचे प्रयत्न असणार आहेत.
                                      – विजय शिंदे, व्यवस्थापक, बालगंधर्व रंगमंदिर

एसी यंत्रणेची दुरुस्ती व्हावी, ही कलाकारांची कित्येक दिवसांची मागणी होती. आता संपूर्ण एसी यंत्रणाच नवीन बसविली जाणार असल्याने नाट्यगृह महिनाभर बंद राहिले तरी ती खूप चांगली गोष्ट आहे. कलाकारांना त्याचा नक्कीच फायदा होईल.
                                                  – सुनील महाजन, अध्यक्ष, संवाद, पुणे

हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news