पुणे : पुढारी वृत्तसेवा
थेऊर येथील बंद असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याचा कारभार अद्यापही प्रशासकांच्या हाती सुपूर्त करण्यास राज्य सहकारी बँकेस यश आलेले नाही. कारखान्याचे लेखापरीक्षण पूर्ण करून कारखान्याचा दफ्तरासह मालमत्तेचा ताबा प्रशासक बी. टी. लावंड यांना मिळालेला नसल्याने यशवंत कारखान्याचे भिजत घोंगडे कायम असून, राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेमुळे ऊस उत्पादक शेतकर्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
यशवंत कारखान्याचे सन 2018-19 व 2019-20 या वर्षाचे लेखापरीक्षण करण्यासाठी सहकारी संस्थांचे द्वितीय लेखापरीक्षक (साखर) अजय देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये कारखान्यावर अवसायकाची नेमणूक केलेले आदेश रद्द करण्यात आले आणि सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड यांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली.
मात्र, लेखापरीक्षकांना कारखान्याचे दफ्तर अद्याप उपलब्ध न झाल्याने सहकारमंत्र्यांच्या आदेशाचे पालन होण्यास विलंब होत आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबत राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांना 4 एप्रिल रोजी पत्र दिले आहे. यशवंत कारखान्याचे 2018-19 व 2019-20 वर्षाचे लेखापरीक्षण करण्यासाठी लेखापरीक्षकांना दफ्तर व मालमत्तेचा पदभार देण्याकामी त्यांनी राज्य बँकेचे सहायक व्यवस्थापक आणि यशवंत कारखान्याचे तत्कालीन अवसायक सतीश सांळुके यांना सूचना द्याव्यात, असे नमूद केले आहे. त्यानंतरही सध्यातरी कोणतीच प्रगती पूर्ण झालेली नसल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.
राज्य बँकेच्या अधिकार्याच्या अवसायक कालावधीतील लेखापरीक्षण पूर्ण न झाल्यामुळे यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकपदाचा पदभार बी. टी. लावंड यांनी स्वीकारला नाही, ही वस्तुस्थिती आहे. या कारखान्याचे लेखापरीक्षण आर्थिक वर्ष 2017-18 अखेर झालेले आहे. पुढील वर्षाचे लेखापरीक्षण पूर्ण झाल्यानंतरच प्रशासक कारखान्याचा पदभार घेतील. तसे लेखी पत्र साखर आयुक्तांनीही राज्य बँकेस दिले आहे.
– धनंजय डोईफोडे, प्रादेशिक साखर सहसंचालक, पुणेयशवंत सहकारी साखर कारखान्याचे लेखापरीक्षण युद्धपातळीवर करण्याच्या सूचना नियुक्त लेखापरीक्षकांना दिलेल्या आहेत. ते लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा असून, कारखान्यावर नियुक्त प्रशासकांना लेखापरीक्षण पूर्ण करून 15 जूनपर्यंत ताबा देण्याचे नियोजन आम्ही केले आहे.
– विद्याधर अनास्कर, प्रशासक, राज्य सहकारी बँक, मुंबई