ज्ञानवापी प्रकरण : आज वाराणसी न्यायालयात आज सुनावणी | पुढारी

ज्ञानवापी प्रकरण : आज वाराणसी न्यायालयात आज सुनावणी

वाराणसी : वृत्तसंस्था ज्ञानवापी परिसरात आढळलेल्या शिवलिंगाची पूजा-अर्चा करण्यास परवानगी मिळावी म्हणून श्री काशी विश्वनाथ मंदिराचे माजी महंत डॉ. कुलपती तिवारी हे सोमवारी वाराणसी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. सोमवारीच माता शृंगार गौरी-ज्ञानवापी प्रकरणाचीही सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्यासमोर पार पडणार आहे.

याच क्रमात खटल्यातील वादी महिला, डीजीसी सिव्हिल तसेच अंजुमन इंतजामिया मशीद समितीच्या विनंती तसेच हरकत अर्जांवरही जिल्हा सत्र न्यायाधीश सुनावणी घेतील. ज्ञानवापी प्रकरणात प्रार्थनास्थळ अधिनियम (1991) लागू होतो अथवा नाही, या महत्त्वपूर्ण कायदेशीर मुद्द्यावरही यावेळी सुनावणी होईल. तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने20 मे रोजी दिलेल्या आदेशान्वये शनिवारीच दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) रवी कुमार दिवाकर यांच्या न्यायालयातून ज्ञानवापी प्रकरणाशी संबंधित सगळी कागदपत्रे जिल्हा न्यायालयाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

एका मोठ्या कालावधीनंतर भोलेबाबा भक्तांना भेटलेले आहेत. त्यांची नियमित पूजा-अर्चा न होणे शिवभक्तांसाठी क्लेशदायक आहे.
– डॉ. कुलपती तिवारी, माजी महंत, श्री काशी विश्वनाथ मंदिर, वाराणसी

कुतुबमिनार याचिकेवर उद्या होणार सुनावणी 

दिल्लीतील कुतुबमिनार परिसरात पूजाअर्चा करण्याची परवानगी देण्यात यावी म्हणून दाखल याचिकेवर दिल्लीतील साकेत न्यायालयात 24 मे रोजी सुनावणी होणार आहे.दरम्यान, उत्खनन करण्याचा आदेश पुरातत्त्व खात्याला देण्यात आलेला नाही, असे केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यापूर्वी असा आदेश मंत्रालयाने खात्याला दिल्याचे सांगण्यात येत होते.

युनायटेड हिंदू फ्रंटने साकेत न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे, की 27 हिंदू व जैन मंदिरांची तोडफोड करून कुव्वत-उल-इस्लाम मशिदीची तसेच कुतुबमिनार परिसराची उभारणी करण्यात आली आहे. तशा उल्लेखाचा एक फलकदेखील या भागात आहे. पुरातत्त्व खात्याच्या एका अधिकार्‍याने आचार्य वराहमिहिर यांच्या नेतृत्वाखाली हा परिसर बांधण्यात आल्याचा दावा अलीकडेच केला होता. त्यामुळे या भागात हिंदू, जैन मूर्ती पूर्ववत स्थापित करून पूजा अर्चनेची परवानगी देण्यात यावी.

हे ही वाचलंत का?

Back to top button