ओतूर: जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील कोपरे, जांभूळशी, मांडवे, मुथाळणे, माळ्याचीवाडी, काठेवाडी, मुठेवाडी, बांगरवाडी, डामसेवाडी, कुडाळवाडी परिसरातील महिला, लहान मुले , वयोवृध्द हे पाण्यासाठी पायपीट करीत आहेत. या भागातील पाणी समस्या अद्याप सुटलेली नाही.
दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या व घरगुती वापराच्या पाण्यासाठी आदिवासींना संघर्ष करायला लागतो. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या गावांमध्ये केंद्र सरकारच्या जलजीवन योजनेच्या माध्यमातून पाईप लाईन टाकल्या आहेत. परंतु, नदीतच पाणी नसेल तर नळाला पाणी कुठून येणार असा प्रश्न येथील आदिवासी बांधव विचारीत आहेत. प्रशासनाकडून पाणी योजना राबविण्याचा कागदोपत्री प्रयत्न सुरू आहे. (Latest Pune News)
या भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. पावसाळ्यात हा परिसर निसर्ग सौंदर्याने नटून जातो. निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकदेखील गर्दी करतात. परंतु, पाणी अडवण्यासाठी उपाययोजना न केल्याने उन्हाळ्यात मांडवी नदी कोरडी पडते.
त्यामुळे आदिवासी जनतेला दरवर्षी पाण्यासाठी भटकंती करावी लागते. गेली कित्येक वर्षे हा प्रश्न तसाच असल्याने आदिवासींना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे.
आदिवासी बांधवांच्या व्यथा जाणून घेण्यास प्रशासन, नेते यांना वेळ नाही अशी तक्रार येथील प्रत्येक नागरिकांची आहे. या गावापैकी कोपरे, जांभूळशी ही गावे खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी दत्तक घेतली होती. मात्र, या गावातील आदिवासींची पाण्यासाठी भटकंती अद्याप सुरूच आहे.
एमआय टँक हाच उपाय
सदर चार गावे व त्यांच्या वाड्यावस्त्या मिळून जवळपास 8 हजारांच्या वर लोकवस्ती आहे. येथील ग्रामस्थांची एमआय टँक व्हावा अशी अनेक वर्षांपासूनची प्रमुख मागणी आहे. टँक झाला तर या भागातील पाण्याची समस्या सुटू शकते. पाण्याची उपलब्धता झाल्यास या भागाचा विकास होऊन रोजगाराची व मोलमजुरीसाठी होणारी आदिवासींची भटकंती देखील थांबू शकते.
कोपरे, मांडवे, जांभूळशी, मुथाळणे यासह बारा वाड्या- वस्त्यांच्या पाणी प्रश्नाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची प्रामाणिक इच्छा प्रशासनाला आणि राज्यकत्र्यांना दिसत नाही. शेतकरी पावसाच्या पाण्यावर शेती करीत असल्याने गावात फक्त भाताची लागवड होते. दसरा - दिवाळीनंतर रोजगाराच्या शोधात स्थानिक गावकरी मजुरीसाठी इतरत्र स्थलांतर करतात.
- लक्ष्मण कुडळ, ग्रामस्थ जांभूळशी.