आळंदी: नेत्रदीपक रोषणाई, लख्ख दिव्यांचा प्रकाश..। फटाक्यांची आतषबाजी अन् इंद्रायणीच्या भव्य आरतीने अवघा इंद्रायणी नदीकाठ दुमदुमला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर जन्ममहोत्सवानिमित्त आळंदीत पार पडत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात शुक्रवारी (दि. 9) सायंकाळी भव्य रथोत्सव व इंद्रायणी नदीकाठी दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता.
या वेळी इंद्रायणी मातेची आरती झाली. याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आ. नीलम गोर्हे, खा. श्रीरंग बारणे, आमदार उत्तमराव जानकर, आमदार विजय शिवतारे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, सोहळाप्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कबीरबुवा उपस्थित होते. (Latest Pune News)
इंद्रायणी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करत आहोत. केंद्रीय पातळीवरून देखील यासाठी आवश्यक तो निधी तातडीने मंजूर होण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्याने यासाठी बनवलेल्या विकास आराखड्यात केंद्रात अडचण आल्यास ती सोडवण्यासाठी पुढाकार घेऊ. केंद्राकडून आळंदी व वारकर्यांसाठी कायम सहकार्य राहील.
- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री, सहकार व नागरी हवाई उड्डाण
आळंदीसाठी व वारकर्यांसाठी आत्तापर्यंत हवे ते सर्व करण्याचा आणि देण्याचा प्रयत्न केला असून, येत्या काळात देखील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्ती आणि ज्ञानभूमी प्रकल्प या दोन गोष्टी सध्या शासनाच्या प्रामुख्याने समोर असून, या दोन्ही गोष्टींसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. हवे तर ज्ञानभूमी प्रकल्पासाठी नगरविकास विभागातून निधी देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य