

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत नुकताच बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर आता लगेच पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला काही महाविद्यालयांनी सुरुवात केली आहे.
पुण्यातील नामांकित फर्ग्युसन महाविद्यालय, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, सर परशुरामभाऊ महाविद्यालय आदी महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांच्या वेबसाइटवरून प्रवेशासाठी अर्ज करावा लागणार आहे. (Latest Pune News)
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या बीए आणि बीएस्सी पदवीच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 17 मेपर्यंत असणार आहे. त्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादी 19 मे रोजी प्रसिद्ध करण्यात येईल तसेच 21 मे रोजी अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची संधी दिली जाईल. तर 22 मे रोजी पहिली अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.
सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या बीए आणि बीएस्सी पदवीच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणी अर्जासाठी सुरुवात झाली असून, त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 20 मेपर्यंत देण्यात आली आहे. त्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादी 22 मे रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच, महाविद्यालयाची अंतिम गुणवत्ता यादी 24 मे रोजी प्रसिद्ध केली जाईल. पहिल्या यादीची प्रवेश प्रक्रिया 30 मेपर्यंत राबवली जाईल.
आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या बीए आणि बीएस्सी पदवीच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणी अर्जासाठी सुरुवात झाली असून, त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 28 मेपर्यंत देण्यात आली आहे. त्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादी 2 जून रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच, महाविद्यालयाची अंतिम गुणवत्ता यादी 4 जून रोजी प्रसिद्ध केली जाईल.
पहिल्या यादीची प्रवेश प्रक्रिया 6 जूनपर्यंत राबवली जाईल. अशाच प्रकारे अन्य महाविद्यालये देखील पदवी प्रवेश प्रक्रिया राबवत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे, त्या महाविद्यालयाच्या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन अर्ज भरण्याची आवश्यकता आहे.