पुणे; पुढारी वृत्तसेवा : केवळ क्रिकेटच नाही तर इतर खेळांना महत्त्व देत त्यामध्ये ही केवळ महिलांच्या क्रिडा क्षेत्राला व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहे. दै. पुढारी आणि विशेषतः डॉ. योगेश जाधव यांचे विशेष आभार मानत आहे. राईज अप ही स्पर्धा पुढील वर्षी तिसर्या हंगामात प्रवेश करताना केवळ पुणे जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता राज्यस्तरावर ही स्पर्धा आयोजित करावी, त्याला आमचे नेहमीच पाठिंबा असेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध युवा उद्योजक, चित्रपट निर्माते, उत्तम क्रिकेटर, अनेक क्रीडा प्रकारात संघमालक असलेले पुनित बालन यांनी केले.
दै. 'पुढारी'च्या वतीने पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड भागातील खेळाडूंना प्रोत्साहन आणि खेळाचे व्यासपीठ मिळवुन देण्याच्या उद्देशाने 'राईझ अप' पुणे महिला क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या दुसर्या हंगामाची सुरुवात बुध्दिबळ या क्रीडा प्रकाराने झाली. या स्पर्धेचे उद्घाटन प्रसिध्द युवा उद्योजक पुनित बालन, दै. 'पुढारी' चे चेअरमन डॉ. योगेश जाधव, सुर्यदत्ता इन्स्टिटयुटचे संजय चोरडिया, महिला ग्रँडमास्टर स्वाती घाटे, आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिर डॉ. शर्वरी इनामदार, पुणे जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे राजेंद्र कोंडे आदि मान्यवर उपस्थित होते.
बालन म्हणाले, महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी दै. 'पुढारी'च्या वतीने राईज अप क्रीडा स्पर्धा हा स्तुत्य उपक्रम सुरु केलेला आहे. आज बुध्दिबळाच्या 325 हून अधिक महिला खेळाडू सहभागी झालेले आहेत. अशा सर्व क्रीडा स्पर्धांच्या पाठिशी कायम राहणार आहे. दरम्यान, बालन यांनी पुढारी माध्यम समूहाने सुरू केलेल्या पुढारी न्यूज या वृत्तवाहिनीला शुभेच्छा पण दिल्या.
डॉ. योगेश जाधव म्हणाले, दै. 'पुढारी'च्या वतीने गेल्या वर्षी आठ प्रकारांचा समावेश राईज अप क्रीडा प्रकारात केला होता. या हंगामाचे हे दुसरे वर्ष असून त्यामध्ये एका खेळाची वाढ करण्यात आली आहे. ही स्पर्धा केवळ पुणे जिल्ह्यापुरती असली तरी त्याला सांगली, सातारा, कोल्हापुर आदी ठिकाणाहून ही खेळाडू सहभागी होत आहेत. पुण्यासारख्या शहरामध्ये बालेवाडीसह इतर ठिकाणी मैदानांची सुविधा उपलब्ध आहे परंतु, अपेक्षित प्रमाणे त्याचा वापर होताना दिसून येत नाही.
विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होत या सुविधांचा वापर केला पाहिजे. पुण्यातून अनेक खेळाडू नावारुपाला पुढे येत आहेत हेच खेळाडू पुढे भारताचे नेतृत्व करताना दिसतात. हे चित्र कायम राहण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा भरविण्याचा विचार करण्यात आला. शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व पटवुन देण्यासाठी अशा स्पर्धा जास्तीत जास्त होणे अपेक्षित आहे.
या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विनामुल्य प्रवेश दिला आहे. या स्पर्धेला ऑक्सिरिच हे मुख्य प्रायोजक असून सहप्रायोजक म्हणून रुपमंत्रा, मिडीया प्रायोजक म्हणून झी टॉकीज, शैक्षणिक प्रायोजक म्हणून सुर्यदत्ता इन्स्टिटयुट तर सपोर्टिंग पार्टनर म्हणून पुणे महानगरपालिका यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.
हेही वाचा