पोलिस पाटील पदासाठी जन्माचा खोटा दाखला; महिलेवर गुन्हा

पोलिस पाटील पदासाठी जन्माचा खोटा दाखला; महिलेवर गुन्हा

बारामती : पुढारी वृत्तसेवा

सन २०१७ मध्ये झालेल्या पोलिस पाटील पद भरतीवेळी जन्मतारखेचा चुकीचा व खोटा दाखल्याचा वापर करत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी विद्या मारुती उर्फ हनुमंत कोळेकर (रा. कानाडवाडी, चोपडज, ता. बारामती) या महिलेविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मंडल अधिकारी महंमद पापा सय्यद (रा. फलटण रोड, बारामती) यांनी फिर्याद दिली. प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी दिलेल्या प्राधिकृत पत्रानुसार सय्यद यांनी याबाबत फिर्याद दाखल केली.

विद्या कोळेकर यांनी सन २०१७ साली पोलिस पाटील परीक्षेच्या वेळी जन्माचा बनावट दाखला सादर केला असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. त्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने प्रांताधिकाऱयांनी तहसीलदारांना व तहसीलदारांकडून वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. वडगाव निंबाळकर पोलिसांनी त्यांचा चौकशी अहवाल तहसीलदारांना सादर केला.

या अहवालात विद्या मारुती उर्फ हनुमंत कोळेकर यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे सादर केलेला जन्माचा दाखला विवाहापूर्वीच्या विद्या सतीश करे या नावाने सादर केला होता. तो चोपडज ग्रामपंचायतीकडील असून त्यावर १९९१ जन्मतारखी नमूद करण्यात आली होती. वास्तविक त्यांचा जन्म १९९३ साली गणेशवाडी (ता. कर्जत, जि. नगर) येथे झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. पोलिस पाटील पदासाठी वयाची अट पूर्ण कऱण्यासाठी त्यांनी चोपडज ग्रामपंचायतीकडील खोटा दाखला सादर करत शासनाची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news