पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

पुणे / हडपसर : पुढारी वृत्तसेवा : पिण्याचे पाणीपुरवठा करणार्‍या टँकरमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना गुरुवारी (दि. 20) सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. फुरसुंगी येथील पॉवर हाऊसजवळ पाणी सोडत असताना हा प्रकार समोर आला. पाण्याच्या टँकरमध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा खून आहे की महिलेने स्वत:चा जीव घेतला याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.

कौशल्या मुकेश चव्हाण (वय 25, रा. दुगड चाळ, जेएसपीएम कॉलेजजवळ, हांडेवाडी) असे या महिलेचे नाव आहे. कोंढवा परिसरात ही महिला वास्तव्यास होती. हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम नरेंद्र ससाणे (वय 27, रा. दुगड चाळ, हांडेवाडी) यांचा पाण्याचा टँकरचा व्यवसाय आहे. बुधवारी दिवसभर पुण्याच्या विविध भागांत टँकरने पाणी पोहोचवल्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांनी घराजवळ टँकर उभा केला. त्यानंतर ते घरी गेले. त्यांचे हे दैनंदिन काम आहे.

गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी टँकर (एमएच 12 डब्ल्यूजे 1091) बाहेर काढला. त्यानंतर त्यांनी रामटेकडी पॉवर हाऊस येथे पाणी भरले. टँकर घेऊन ते फुरसुंगी येथील पॉवर हाऊसजवळ असलेल्या एका घरी पाणी पोहोचवण्याकरिता गेले. तेथे टाकीत पाणी सोडत असताना पाणीच बाहेर येत नव्हते. त्यामुळे त्यांनी सुरुवातील व्हॉल्व्ह तपासला. तरीदेखील पाणी येत नसल्याने त्यांनी पाइप काढून पाहिला असता, आतून साडी आल्याचे त्यांना दिसले. साडी कुठून आली हे पाहण्यासाठी ते टँकरवर चढले.

आता पोस्ट मॉर्टेमची प्रतिक्षा

टँकरचे झाकण उघडून पाहिले असता आतमध्ये कौशल्या यांचा मृतदेह पाण्यामध्ये आढळून आला. त्यांनी तत्काळ याबाबत हडपसर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत महिलेचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवून दिला. ही महिला नेमकी कोणत्या कारणामुळे घरामधून गायब झाली होती, याचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे हा खून आहे की इतर काही हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होऊ शकेल, असे पोलिस निरीक्षक संतोष पांढरे म्हणाले.

मृत महिला पती आणि दोन मुलांसह उंड्री येथे राहत होती. हे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील आहे. ते एक महिन्यापूर्वीच पुण्यात आले होते. नवरा फरशी बसवण्याचे काम करतो. तर महिला येथील एका इमारतीत कामाला जायची. तिला थोडा मानसिक आजार असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता ही महिला घरातून बेपत्ता झाली. त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली होती. टँकरचालकही तेथेच राहतो. तसेच त्याचा टँकरही तेथेच असतो. ती टँकरमध्ये पडली की उडी मारली हे मात्र सांगता येणार नाही. मात्र, तिच्या अंगावर मारहाणीच्या कोणत्याही खुणा नाहीत. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

– मानसिंग पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे) कोंढवा

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news