टोमॅटो नेमका आला तरी कुठून?

टोमॅटो नेमका आला तरी कुठून?

नवी दिल्ली : टोमॅटो हा सध्या जगभरातील लोकांच्या आहाराचा अविभाज्य भाग बनला आहे. भारतातही प्रत्येक स्वयंपाक घरात टोमॅटो असतोच. अनेक भाज्यांमध्ये टोमॅटोचा किंवा टोमॅटोच्या ग्रेव्हीचा वापर केला जातो. शिवाय टोमॅटो सॉस व केचपही जोडीला आहेतच! मात्र तुम्हाला हे माहिती आहे का, याच टोमॅटोला एके काळी विषारी फळ समजले जात होते?

कधी काळी टोमॅटो हा भारताच्या आहार संस्कृतीचा भाग नव्हता. भारताला टोमॅटोची ओळख सर्वप्रथम पोर्तुगीजांनी करून दिली. गंमत म्हणजे ज्या युरोपातून ही फळभाजी भारतात आली त्याच युरोपमधील अनेक लोक टोमॅटोला विषारी फळ समजत होते! टोमॅटो ही फळभाजी सोलानासी प्रजातीच्या कुटुंबातील आहे. त्याचं शास्त्रीय नाव आहे सोलानम लिकोपर्सिकम. पण, त्याला टोमॅटो या नावानेच सर्वत्र ओळखलं जातं. टोमॅटोमध्ये 95 टक्के पाणी असतं. उर्वरित 5 टक्क्यांमध्ये मॅलिक अ‍ॅसिड, सायट्रिक अ‍ॅसिड, ग्लुटामेट्स, व्हिटामिन सी आणि लायकोपिन आदी पोषणतत्त्वे असतात. लायकोपिन या पोषणतत्त्वामुळेच टोमॅटोला त्याचा लाल रंग प्राप्त होतो. टोमॅटोला त्याचं टोमॅटो हे नाव स्पॅनिश शब्द टोमॅटे यापासून मिळालेलं आहे. पण, मूळ शब्द स्पॅनिशही नाही.

मेक्सिको परिसरात बोलल्या जाणार्‍या अझ्टेक भाषेतून हा शब्द स्पॅनिश भाषेत आला. अझ्टेक भाषेत त्याला झोटोमॅटिल असं संबोधलं जातं. त्याचा अर्थ इंग्लिशमध्ये काहीसा 'पाण्याने भरलेला फुगा' असा होऊ शकेल. दक्षिण अमेरिकेतील पेरू, बोलिव्हिया, चिली आणि इक्वाडोर या परिसरात टोमॅटोची लागवड सर्वप्रथम करण्यात आली, असं मानलं जातं. 'या परिसरातील अँडीज पर्वत क्षेत्रात वर उल्लेख केलेल्या अझ्टेक संस्कृती अस्तित्वाचा उगम झाला होता. तिथेच इसवी सन 700 च्या आसपास टोमॅटोची लागवड सर्वप्रथम करण्यात आलेली असू शकते.

पुढे काही पर्यटकांनी दक्षिण अमेरिकेतून हे टोमॅटो मध्य अमेरिकेला नेले. माया संस्कृतीच्या लोकांनी त्याची लागवड सुरू केली. पण, असं असलं तरी टोमॅटोची लागवड करण्यास नेमका कधी प्रारंभ झाला, हे सिद्ध होणारे सबळ पुरावे अद्याप उपलब्ध नाहीत. आहारतज्ज्ञांच्या मते, ख्रिस्तोफर कोलंबस भारताच्या शोधात युरोपातून निघून अमेरिकेला पोहोचला, त्यानंतर म्हणजेच ईसवीसन 1490 नंतर टोमॅटो पोहोचले असू शकतात. सुरुवातीच्या काळात युरोपात उगवणारे टोमॅटो हे पिवळ्या रंगाचे होते. त्यामुळे त्यांना यलो अ‍ॅपल असं त्यावेळी संबोधलं जात असे. सुरुवातीला ब्रिटनमध्ये टोमॅटो हे विषारी फळ आहे, अशी अफवा पसरलेली होती. त्यांचा वापर केवळ जेवणाचं टेबल सजवण्यासाठी केला जायचा. 1800 सालापर्यंत अमेरिकेतसुद्धा टोमॅटोबाबत विविध प्रकारचे संभ्रम पाहायला मिळतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news