पुन्हा आढळला आरशासारखा चकचकीत खांब

पुन्हा आढळला आरशासारखा चकचकीत खांब

न्यूयॉर्क : जगाच्या पाठीवर दर दिवशी काही अशा घडामोडी घडत असतात, ज्या अनेकांनाच थक्क करतात. अशीच एक घटना नुकतीच अमेरिकेतील लास वेगास इथं घडली असून, इथं आढळलेल्या एका वस्तूनं नकळतच भीतीचं वातावरण तयार केलं आहे. लास वेगासमध्ये अचानकच एक चमचमणारा खांब दिसू लागल्यामुळं खळबळ माजली आहे. या खांबाला 'मोनोलिथ' असं म्हटलं जात आहे.

हा मोनोलिथ अनेक प्रश्न चाळवत असून, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तो इथं आला कुठून? यापूर्वी साधारण 4 वर्षांपूर्वी असाच एक खांब नजरेत आला होता. दरम्यान, यावेळी लास वेगसमधील मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या मोनोलिथसंदर्भात माहिती देत काही फोटोही शेअर केले. लास वेगास शहरापासून साधारण तासाभराच्या अंतरावर असणार्‍या नेवादा वाळवंटीय प्रदेशात हा मोनोलिथ आढळला. आम्ही इथं अनेक विचित्र गोष्टी पाहिल्या आहेत; पण ही गोष्ट फार अनपेक्षित आणि विचित्र आहे, तुम्हीसुद्धा ती पाहिली पाहिजे, अशी सोशल मीडिया पोस्ट करत स्थानिक पोलिसांनी मोनोलिथसंदर्भातील बातमी सर्वदूर पसरवली. आरशासारखा लख्ख चकाकणारा हा खांब इथं कुठून आला, यासंदर्भातील माहिती कोणालाही नसून, आता पुन्हा एकदा मोनोलिथ आणि त्याच्या अवतीभोवती असणारे कुतूहलपूर्ण प्रश्न आणि नवनवीन सिद्धांत डोकं वर काढताना दिसत आहेत.

अमेरिकेच्याच युटामधून या रहस्यानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं होतं, जिथं वाळवंटामध्ये हे खांब दिसले होते. 2020 मध्ये कॅलिफोर्नियामध्येही अशाच पद्धतीचे खांब आढळले होते. तांत्रिकद़ृष्ट्या मोनोलिथ एक प्रकारचा दगड असून, सहसा तो एखाद्या स्तंभाच्या आकारात आढळतो. असं म्हणतात की, गतकाळात ते एखाद्या खास ठिकाणी ठेवले जात होते. इतिहासकारांना अशा प्रकारचे अश्मयुगीन खडक आजवर अनेकदा सापडले आहेत; पण हल्ली निदर्शनास येणारे हे खांब मात्र खडकाचे नसून, ते धातूचे असल्याचं म्हटलं जात आहे. याशिवाय त्यांची चमक लक्ष वेधणारी ठरत आहे, ज्यामुळे हे मोनोलिथ आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news