मंचर : बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी; कुरवंडी येथील घटना

file photo
file photo
Published on
Updated on

मंचर; पुढारी वृत्तसेवा: कुरवंडी (ता. आंबेगाव) येथे घराबाहेर असलेली गाय सोडण्यासाठी गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने प्राणघातक हल्ला करत महिलेला गंभीर जखमी केले आहे. ही घटना ४ सप्टेंबरला रात्री सात वाजल्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात सुलोचना देविदास मते (वय ५० रा. कुरवंडी चव्हाण वस्ती ता. आंबेगाव) यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून त्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

याबाबत माहिती अशी की, सुलोचना मते यांचे घर चव्हाणवस्ती येथे असून घराशेजारी जंगलाचा भाग आहे. त्यांची गाय ते चरण्यासाठी जंगलाच्या शेजारी बांधत असतात. रविवारी रात्री सात वाजताच्या दरम्यान त्या गाय सोडण्यासाठी गेल्या असता बाजूलाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने डरकाळी फोडत त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी घाबरून जोरजोरात आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला. मात्र या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला मोठी जखम झाली आहे. कुटुंबियांनी त्यांना घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

उपचार घेऊन त्या घरी आल्या असून त्यांचे डोके दुखत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुन्हा उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे दाखल करणार असल्याचे कुटुंबियांनी सांगितले. घटनेची माहिती कळताच वनविभागाने वनपरिक्षेत्राधिकारी पी.एस.रौंदळ यांनी घटनेची माहिती घेतली. सोमवारी सकाळी पी.एस. रौंदळ, वनपाल एस.एल गायकवाड, वनरक्षक एस.बी वाजे, वनरक्षक ए. एस.होले, आर.सी शिंगाडे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करत घटनेची माहिती घेतली आहे. या परिसरात बिबट्याचा वावर असून वन विभागाने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी सरपंच मनीषा तोत्रे, माजी पंचायत समिती सदस्य जितेंद्र माळुजे, उपसरपंच जितेंद्र तोत्रे, रवींद्र तोत्रे, ग्रामपंचायत सदस्य दगडू मते यासह ग्रामस्थांनी केली आहे.

काळजी घ्यावी
दरम्यान जंगल क्षेत्र, उसाचे क्षेत्र परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी एकट्याने बाहेर पडू नये, आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावी असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एस. रौंदळ यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news