विधानसभेसाठी 8 ते 10 जागांची मागणी करणार: रामदास आठवले

विधानसभेसाठी 8 ते 10 जागांची मागणी करणार: रामदास आठवले

लोणावळा : लोकसभेच्या जागावाटपात रिपब्लिकन पार्टी आफ इंडिया (आठवले गट) गटाला एकही जागा मिळाली नव्हती. मात्र, विधानसभेला राज्यात 8 ते 10 जागा लढवून त्या निवडून आणण्याचा निर्धार आम्ही केला असल्याचे पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लोणावळ्यात बोलताना सांगितले. तसेच, अजित पवार आणि एकनाथ शिंदे नाराज असण्याचे काहीही कारण नसून महायुती मजबूत आणि बळकट असल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला आहे.

लोणावळा शहरात सत्कार

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे मंगळवारी (दि. 18) महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्या वतीने लोणावळा शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, भाजपचे शहराध्यक्ष अरुण लाड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विलास बडेकर, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय भोईर, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, भाजप गटनेते देविदास कडू, माजी नगरसेवक ललित सिसोदिया, आरपीआयचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, यमुना साळवे, गणेश गायकवाड, अर्जून पाठारे, अभय पारख, जयप्रकाश परदेशी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी रामदास आठवले बोलत होते.

रामदास आठवले म्हणाले की, मला राज्यसभा खासदार केलेले असल्याने आणि राज्यात प्रचाराची जबाबदारी माझ्यावर असल्याने आम्हाला लोकसभेला जगावाटपात सीट मिळाली नाही. मात्र, विधानसभेला आम्ही महायुतीकडे 8 ते 10 जागांची मागणी करणार आहोत. महायुतीत भाजप, शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी, महादेव जानकर यांची रासप, आरपीआय, विनय कोरे यांचा यांचा जनसुराज्य पक्ष असे अनेकजण एकत्र असल्याने सर्वांना योग्य प्रमाणात जागावाटप करावे लागणार आहे. त्यामुळे चर्चेला बसल्यावर मागणीपेक्षा काही जागा कमी जास्त होऊ शकतील, अशी शक्यतादेखील आठवले यांनी व्यक्त केली.

विरोधकांकडून खोटा प्रचार

इंडिया आघाडीमधील घटक पक्षांनी मतदारांना ब्लॅकमेल करून आणि संविधान बदलणार अशी अफवा पसरवून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महायुतीला लोकसभा निवडणुकीत अपयश आले आहे. आम्ही विधानसभेला याची काळजी घेणार आहोत. दलित आणि अल्पसंख्याक यांचा गैरसमज दूर करून त्यांना आमच्या बाजूला वळवून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची राज्य सरकारची भूमिका असून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन राज्यात विधानसभेच्या कमीतकमी 170 ते 180 जागा निवडून आणण्याचा निर्धार महायुतीने केला असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

तळेगाव येथे स्वागत

तळेगाव स्टेशन : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे मंगळवारी (दि. 18) नियोजित कार्यक्रमास नारायणगावकडे जात असताना त्यांचे तळेगाव दाभाडे स्टेशन चौकात दुपारी आगमन झाले. या वेळी रिपब्लिकन पार्टी आफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने त्यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. या वेळी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, मावळ तालुकाध्यक्ष नारायण भालेराव, तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष संदीप शिंदे, सुनील पवार, कामगार नेते अनिल गायकवाड, तानाजी गडकर, सिध्दार्थ कदम, महेंद्र साळवे, दिलीप डोळस आदी उपस्थित होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news