शेतकर्‍यांसाठी दुष्काळात तेरावा महिना ; रानडुकरांचा धुमाकूळ

शेतकर्‍यांसाठी दुष्काळात तेरावा महिना ; रानडुकरांचा धुमाकूळ

दिवे : पुढारी वृत्तसेवा :  यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. परिसरातील काही शेतकर्‍यांनी बाजरीचे उत्पादन घेतले आहे; मात्र सध्या जंगली प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने ते मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. यामध्ये रानडुकरांचा समावेश असून, ती उभी पिके उद्ध्वस्त करीत आहेत. परिणामी, दुष्काळात तेरावा अशी परिस्थिती शेतकऱ्यांपुढे उभी ठाकली आहे. सोनोरी येथील शेतकरी अनिल खेडेकर यांनी आपल्या 30 गुंठे क्षेत्रावर बाजरीचे उत्पादन घेतले आहे. त्यासाठी भरपूर प्रमाणात शेणखत वापरले व अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येत असल्याने बाजरी जोमदार आली.

खेडेकर यांना आपल्या जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न मिटेल, अशी आशा होती. मात्र रानडुकरांनी त्यांच्या उभ्या पिकाचे पूर्णपणे नुकसान केले आहे. दहा टक्केदेखील पीक उभे नाही. खेडेकर यांना साधारण तीस कट्टे म्हणजे दीड टनाच्या पुढे उत्पादन मिळाले असते व जनावरांना किमान सहा महिने पुरेल एवढा चारा उपलब्ध झाला असता; मात्र रानडुकरांनी पीक पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याने खेडेकर कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आहेत.

खेडेकर यांच्याबरोबरच सोनोरी येथील अंजीर उत्पादकांचेदेखील नुकसान झाले आहे. अंजिराच्या मुळ्या उकरून टाकल्या आहेत. त्यामुळे झाड वाळण्याची शक्यता आहे. परिसरातील शुभम काळे व इतर शेतकर्‍यांचे अंजिराचे नुकसान झाले आहे. काळेवाडी परिसरातदेखील असंख्य शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. एवढे नुकसान झाल्याने वनविभागाने ताबडतोब पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

पाण्याअभावी शेती, दुग्धव्यवसाय अडचणीत
ज्या शेतकर्‍यांकडे शेततळी आहेत, त्यांनी आतापर्यंत कशाबशा आपल्या बागा वाचवल्या आहेत; मात्र आता शेततळ्यातील पाणीसाठादेखील पूर्णपणे आटला आहे. अशा परिस्थितीत जनावरांच्या चार्‍याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दुग्धव्यवसायदेखील आता अडचणीत सापडला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news