पब, हॉटेलच्या अनधिकृत पार्किंगकडे दुर्लक्ष का? कल्याणीनगर येथील नागरिकांचा सवाल

पब, हॉटेलच्या अनधिकृत पार्किंगकडे दुर्लक्ष का? कल्याणीनगर येथील नागरिकांचा सवाल

वडगाव शेरी : पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगर परिसरात पब, बार आणि हॉटेलमालकांनी बंगल्यांमध्ये व्यवसाय सुरू केले आहेत. मात्र, त्यांच्याकडे पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी येणारे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करीत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. याबाबत नागरिक आणि सामाजिक संस्थांकडून महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांकडे तक्रारी केल्या जात आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.

कल्याणीनगर परिसरात अनेक आयटी कंपन्या आहेत. या कंपनीतील कर्मचारी जेवण, नाष्टा करण्यासाठी हॉटेलमध्ये जातात. आयटीतील ग्राहकांची संख्या जास्त असल्याने या भागामध्ये छोटे-मोठे हॉटेल, बार अँड रेस्टॉरंट आणि पबची संख्या वाढली आहे. कल्याणीनगर येथील एका सोसायटीच्या तळमजल्यावरील फ्लॅटमध्ये पब असून, त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाही. यामुळे पबमध्ये येणारे ग्राहक रस्त्यावरच वाहनांचे पार्किंग करतात. या रस्त्यावर पबमालकाने जणू ताबा मारला आहे. त्या ठिकाणी असलेल्या पदपथावर नागरिकांना चालू दिले जात नाही.

बिशप शाळेच्या परिसरात असलेल्या दोन्ही रस्त्यांवर हॉटेलमध्ये येणार्‍या ग्राहकांची वाहने पार्क केली जातात. जॉगर्स पार्क, गणपती मंदिर, कल्याणी बंगला या ठिकाणी असलेल्या रस्त्यांवर देखील वाहनांचे पार्किंग केले जात आहेत. पार्किंगमुळे रस्त्यांची रुंदी कमी होत असल्याने वाहतूक कोंडी होत असून, अपघातही होत आहेत.

पार्किंगचा आराखडा नावापुरताच

इमारतीचे बांधकाम करताना प्रत्येक व्यावसायिकाने पार्किंगची व्यवस्था केलेली असते. इमारतीच्या बांधकाम नकाशात पार्किंगचा आराखडा असतो. महापालिकेच्या बांधकाम विभागाने या बाबीची तपासणी केल्यानंतर संबंधिताला बांधकामास पूर्णत्वचा दाखल दिला जातो. मात्र, हा दाखल्या घेतल्यानंतर पार्किंगमध्ये व्यवसाय सुरू केला जातो. पार्किंगच्या जागेवर व्यवसाय करणार्‍यांवर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना व अधिनियम अ‍ॅक्ट 1966 नुसार कारवाई होते. मात्र, बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कल्याणीनगर परिसरातील अनेक पब आणि हॉटेलचालकांकडे पार्किंगची व्यवस्था नसूनदेखील ते व्यवसाय करीत आहेत. या ठिकाणी येणारे ग्राहक रात्री रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचे पार्किंग करतात. त्यामुळे रात्री अपघात होतात. 'नो पार्किंग'मधील सामान्य नागरिकांच्या गाड्यांवर नियमित कारवाई
होते. मग पब व हॉटेल व्यावसायिकांच्या ग्राहकांच्या वाहनांवर कारवाई
केली जात नाही?

– गौरव करंजे, रहिवासी, कल्याणीनगर

कल्याणीनगरमध्ये दिवसा 'नो पार्किंग' आणि रस्त्यावर उभ्या करण्यात येणार्‍या वाहनांवर नियमितपणे कारवाई केली जाते. पबमध्ये येणारी वाहने रात्री नऊनंतर रस्त्यावर पार्किंग केली जातात. रात्री कारवाईसाठी टोइंग व्हॅन उपलब्ध नसते. नागरिकांनी रस्त्यावरील पार्किंगसंदर्भात तक्रार केल्यास तातडीने कारवाई केली जाईल.

– शैलेश संखे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, येरवडा वाहतूक विभाग

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news