नाट्यकर्मींच्या नावाने थिएटर का नाहीत? : अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा सवाल

नाट्यकर्मींच्या नावाने थिएटर का नाहीत? : अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा सवाल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राजकीय नेते, उद्योजकांच्या नावाने नाट्यगृहे दिसतील. पण, आपल्याकडे नाट्यगृहांना नाट्यकर्मीचे नाव का नाही, असा सवाल ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी गुरुवारी उपस्थित केला. राजकीय नेत्यांच्या नावे नाट्यगृहे, हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील चित्र आहे. गिरीश कर्नाड, शंभू मित्रा, तन्वीर हबीब, पं. सत्यदेव दुबे यांच्या कुणाच्याही नावाने नाट्यगृह नाही, ही वस्तुस्थिती एक नाट्यकर्मी म्हणून मला खटकते. नाटकांची जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात फक्त बालगंधर्व आणि डॉ. काशीनाथ घाणेकर यांची नावे वगळता नाट्यकर्मींच्या नावाने नाट्यगृह नाही. नाट्यकर्मींचेही नाव नाट्यगृहांना दिले पाहिजे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि लागू परिवार यांच्या वतीने उभारलेल्या श्रीराम लागू रंग – अवकाश प्रकल्पाचे उद्घाटन नसीरुद्दीन शाह यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ अभिनेत्री दीपा लागू, पुत्र डॉ. आनंद लागू, अभिनेत्री रत्ना पाठक शाह, सेंटरचे अध्यक्ष डॉ. मोहन आगाशे, कार्याध्यक्ष एस. पी. कुलकर्णी आदी उपस्थित होते. मला डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत काम करण्याचे भाग्य कधी मिळाले नाही, पण, नकळत त्यांनी मला अभिनय शिकवला असे मला वाटते. जीवन आणि जगाविषयी माझी मते बनविण्यामध्ये डॉ. लागू यांचा समावेश होतो, अशा शब्दांत शाह यांनी डॉ. श्रीराम लागू यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या.

शाह म्हणाले की, एनएसडीमध्ये शिक्षण घेत असताना 'आधे अधूरे' पाहण्यासाठी ज्योती सुभाष यांनी मला कमानी रंगमंच येथे नेले. त्यापूर्वी ओम शिवपुरी आणि अमरीश पुरी यांनी साकारलेले 'आधे अधूरे' पाहिले होते. हे दोघेही कसलेले नाट्यकर्मी होते. पण, आवाजाचा चढ – उतार, स्वच्छ शब्दोच्चार आणि डोळ्यांतील भाव याने नटलेला डॉ. लागू यांचा अभिनय पाहून मी अचंबित झालो. खरे तर त्या वेळी प्रेक्षागृहात नाचण्याची इच्छा मला झाली होती. मी डॉ. लागू यांचे 'नटसम्राट' नाटक कधी पाहिले नाही. पण, 'गिधाडे', 'कस्तुरी मृग' आणि अखेरचे 'सूर्य पाहिलेला माणूस' ही नाटके पाहिली आहेत. तसेच, 'सामना' हा चित्रपट पाहिला. मी असे काम कधी करू शकेन का, असा प्रश्न स्वतःला विचारला आणि 'नाही' असे उत्तर मिळाले. पण नकळत एकलव्याप्रमाणे मी त्यांच्याकडून खूप शिकत राहिलो. डॉ. आगाशे यांनी प्रास्ताविक केले. डॉ आनंद लागू आणि शुभांगी दामले यांनी मनोगत व्यक्त केले.  राजेश देशमुख यांनी निवेदन केले तर किरण यज्ञोपवीत यांनी आभार मानले.

दोन चित्रपटांमध्ये मी आणि डॉ. श्रीराम लागू यांनी सोबत काम केले. पण, एकत्रित चित्रीकरण नसल्याने कधी समोरासमोर काम करण्याची संधी मिळाली नाही. हिंदी चित्रपटात डॉ. श्रीराम लागू यांना त्यांच्या योग्यतेच्या नसलेल्या भूमिका पाहून मला त्रास होतो. आजच्या नवोदित कलाकारांना त्यांचा उत्कृष्ट अभिनय असलेले नाटक पाहता येणार नाही, याची खंत वाटते.

नसीरुद्दीन शाह, ज्येष्ठ अभिनेते

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news