

मुंढवा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पावसामुळे शहरातील विविध रस्त्यांची सध्या दुरवस्था झाल्याने नागरिक व वाहनचालकांची गैरसोय होत आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी कनिष्ठ अभियंत्यांना तातडीने रस्ते दुरुस्तीचे आदेश दिले आहेत. हे काम न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा त्यांनी संबंधितांना दिला आहे. मात्र, केशवनगर येथील मुख्य रस्त्यांची अद्यापही दुरुस्ती झाली नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे केशवनगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले असल्याने वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. तसेच दुचाकी वाहने घसरून अपघातही होत आहेत. केशवनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून रेणुकामाता मंदिर रस्ता व मांजरी रस्ता या दोन्ही रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली आहे.
महापालिकेने रस्ते दुरुस्तीची मोहीम सुरू केल्यावर येथे आवश्यक रस्ते दुरुस्ती होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, येथे केवळ दुरुस्तीच्या नावाखाली केवळ तात्पुरती मलमपट्टी केल्यामुळे अल्पावधीत रस्त्यांची पुन्हा दुरवस्था होत आहे. यामुळे परिसरातील रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती होणार कधी, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
केशवनगर येथील दोन्ही रस्त्यांवर जलवाहिनी व पावसाळी वाहिन्यांची कामे केली जाणार आहेत. ही कामे झाल्यावर रस्ते दुरुस्ती करणार आहोत. त्यामुळे सर्व रस्ते दुरुस्ती केली नाही.
मयूर जाधव,
कनिष्ठ अभियंता, महापालिका
हेही वाचा