

उजळाईवाडी, पुढारी वृत्तसेवा : उद्योगनगरी कोल्हापुरात मोठा उद्योग आणण्यासाठी सर्वांनी गट-तट, पक्ष बाजूला सोडून एकत्र या, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील मुख्य रस्त्याचे चौपदरीकरण, पाणीपुरवठा, जल शुद्धीकरण केंद्र आदी विकासकामांचा शुक्रवारी त्यांच्या हस्ते शुभारंभ झाला.
जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी 120 कोटींचा निधी मंजूर केला आहे, असे सांगत ज्यांची जमीन उद्योगासाठी गेली आहे, त्यांना चांगली नोकरी देण्याचे भान उद्योजकांनी ठेवावे, असे सांगत सामंत म्हणाले, एमआयडीसीत अनेक ठिकाणी ट्रक रस्त्यावर लावले जातात.
त्यामुळे अपघाताचे प्रमाण मोठे आहे. यामुळे जिथे एमआयडीसी तिथे ट्रक टर्मिनल असेल, असेही त्यांनी सांगितले. उद्योगाला 24 तास वीज पुरवठा करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. सीएसआरचा उपयोग संस्कृतीत व धार्मिक कार्यक्रमावर न होता शिक्षण व आरोग्यावर व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एमआयडीसीसाठी जागा अधिग्रहण केल्यानंतर चॅप्टर 6 नंतर होत असलेली खरेदी-विक्री बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार धैर्यशील माने म्हणाले, कोल्हापूर ही उद्योगनगरी आहे. जिल्ह्यात उद्योग क्लस्टर व्हावा. विकासवाडीजवळ उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करावेे. खासदार धनंजय महाडिक म्हणाले, कोल्हापूरचा विकास हा स्वकर्तृत्वावर झाला आहे. कोल्हापूर विकासाचे हब होण्यासाठी तयार आहे. यासाठी शासनाने ताकद देण्याची गरज असून कोल्हापूर व सांगलीच्या मध्यवर्ती एमआयडीसी व्हावी. आ. ऋतुराज पाटील म्हणाले, एमआयडीसीमध्ये कारखान्याला भीषण आग लागली तेव्हा फायर स्टेशन नसल्यानेे तारांबळ उडाली होती. यामुळे एमआयडीसीत फायर स्टेशन व्हावे, अशी मागणी केली .
स्वागत मुख्य अभियंता नितीन वानखेडे यांनी केले. प्रास्ताविक गोशिमाचे अध्यक्ष दीपक चोरगे यांनी केले. कार्यकारी अभियंता अतुल ढोरे यांनी आभार मानले. मॅकचे अध्यक्ष हरिचंद्र धोत्रे यांनी कागल एमआयडीसीतील पायाभूत सुविधांसाठी निवेदन देऊन उद्योजकांच्या अडचणी मांडल्या.
कार्यक्रमास एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, विज्ञान मुंडे, सत्यजित जाधव, गोशिमाचे उपाध्यक्ष स्वरूप कदम, स्मॅकचे उपाध्यक्ष एम. वाय. पाटील, जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण, राजेखान जमादार, शिवाजी जाधव, आदींसह मान्यवर उपस्थित होते.