

पुणे: लग्नाचे निमंत्रण आले म्हणून आनंदाने संदेश उघडला आणि काही क्षणांतच बँक खात्यातील कष्टाची कमाई गायब झाली, तर? सध्या सायबर गुन्हेगारांनी आर्थिक फसवणुकीसाठी लग्नपत्रिकेचा नवा फंडा वापरण्यास सुरुवात केली आहे. व्हॉट्सॲपवर लग्नपत्रिका पाठवल्याचा संदेश देत त्यासोबत 'एपीके' फाईल पाठवली जाते.
ही फाईल लग्नपत्रिका समजून उघडली आणि त्यातील ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल केले, तर सायबर गुन्हेगारांना तुमच्या मोबाईलमधील खासगी माहिती आणि बँक व्यवहारांपर्यंत पोहचण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे व्हॉट्सॲपवर आलेली लग्नपत्रिका पाहण्यासाठी अनोळखी ॲप इन्स्टॉल करू नका, असा सावधगिरीचा इशारा ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ आणि माहिती तंत्रज्ञानतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी दिला आहे.
व्हॉट्सॲपवर 'आमच्या लग्नाला नक्की या, पत्रिका सोबत पाठवली आहे,' असा संदेश पाठवला जातो. त्यासोबत जोडलेल्या फाईलचे नाव लग्नपत्रिकेसारखे असते. मात्र, फाईलच्या नावाच्या शेवटी '.एपीके' असे लिहिलेले असते. ही अँड्रॉईड मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल करण्यासाठी वापरली जाणारी फाईल असते. ती उघडल्यानंतर मोबाईलवर ॲप इन्स्टॉल करण्याची परवानगी मागितली जाते. वापरकर्त्याने परवानगी दिली, तर घातक ॲप मोबाईलमध्ये कार्यान्वित होऊ शकते.
अशा प्रकारचे घातक ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर ते संदेश वाचणे, संपर्क क्रमांक किंवा इतर माहिती मिळवणे, अशा परवानग्या मागू शकते. वापरकर्त्याने या परवानग्या दिल्यास बँकेकडून पाठवले जाणारे ओटीपी आणि इतर संवेदनशील माहिती सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहचू शकते. बँकेचे लॉगिन तपशीलही त्यांच्या हाती लागल्यास त्याचा वापर आर्थिक व्यवहारांसाठी केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे, लग्नाची तारीख, ठिकाण किंवा मंगल कार्यालयाचा पत्ता समजण्यासाठी कोणत्याही ॲपला मोबाईलमधील संदेश वाचण्याची परवानगी आवश्यक नसते. त्यामुळे अशा परवानग्या मागणाऱ्या ॲपबाबत विशेष सतर्क राहणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
फसवणूक झाल्यास तातडीने कृती करा
लग्नपत्रिका आली असेल तर शंका आल्यास त्याच क्रमांकावर फोन करा
शक्यतो पत्रिका छायाचित्र किंवा पीडीएफ स्वरूपात मागवावी
चुकून घातक ॲप इन्स्टॉल झाले असल्यास तातडीने मोबाईल डेटा आणि वाय-फाय बंद करावे
त्यानंतर दुसऱ्या सुरक्षित मोबाईलवरून बँकेच्या अधिकृत क्रमांकावर संपर्क साधावा
संशयित ॲप काढून टाकावे, गुगल प्ले प्रोटेक्टच्या माध्यमातून मोबाईलची तपासणी करावी
सुरक्षित उपकरणावरून बँकिंगचे पासवर्ड बदलावेत
बँक खात्यातून पैसे गेल्याचे लक्षात आल्यास विलंब न करता बँकेला कळवावे
राष्ट्रीय सायबर आर्थिक फसवणूक हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा