आळंदी : पुढारी वृत्तसेवा : 'युगे अठ्ठावीस' म्हणत विठ्ठलाऐवजी स्वतःलाच ओवाळून घेणारा महाराज सध्या अख्खं राज्य व्हिडीओत पाहतंय. दुसरीकडे बाईच्या प्रेमापोटी बाईच्या पतीची हत्या करत 'कामातुराणां न भयं, न लज्जा' ही उक्ती खरी ठरवत गजाआड गेलेला एक महाराज सध्या बातम्यांची हेडलाईन बनलाय. याशिवाय चिमुकल्यांवर अनैसर्गिक अत्याचार करत गेल्या काही वर्षांत अनेक महाराज मंडळी गजाआड झाली आहे. हे सगळं पाहिल्यावर या कीर्तनकार महाराज मंडळींना झालयं तरी काय, असा सवाल आळंदीकर उपस्थित करीत आहे. त्यांना नैतिकता आणि कीर्तनकार गादीचा मान शिकवणार तरी कोण, असा सवाल सध्या उपस्थित होऊ लागला आहे.
आळंदी आणि वारकरी संप्रदाय एक अजोड अस नातं आहे. वारकरी संप्रदाय वाढविण्यामागे आळंदीचा सिंहाचा वाटा आहे.
आळंदीतून वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन राज्यभर कीर्तन करत संस्थेचा नावलौकिक वाढविणारे अनेक महाराज मंडळी ऋषितुल्य आणि पूजनीय बनली आहेत आणि तो त्यांचा हक्कही आहेच. मात्र, गेल्या काही वर्षांपासून उदयास आलेली युवा कीर्तनकार महाराजांची पिढी मात्र स्वतःलाच 'अहंम ब्रह्मासमी' म्हणत स्वतःलाच देव मानू लागल्याचे आणि महाराज पदवीच्या मागे काळे कृत्य करतानाची घटना वारंवार उघडकीस येऊ लागल्या आहेत. शिवाय पात्रता नसताना आपल्या आडनावामागे आळंदीकर लावू नका, असाही सुर मध्यंतरी आळंदी ग्रामस्थांनी काढला होता. यामुळे येत्या काळात कीर्तनकारांना नैतिकता, संहिता शिकवणारे वर्ग सुरू करायचे का, असा प्रश्न पुढे येत आहे. या अशा कृत्यामुळे येणारी पिढी महाराज मंडळींवर विश्वास ठेवणे बंद होईल, असा सुर निघत असून, या महाराज मंडळींना आवरा म्हणण्याची वेळ आता आली आहे.
स्वयंघोषित परमपूज्य संप्रदायभूषण ह.भ.प. श्री राजेंद्र महाराज शेळके आळंदीकर यांनी बाईच्या प्रेमापोटी 'त्या' बाईच्या पतीची हत्या केली. या आरोपाखाली पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
'माय-बापाशिवाय जगात कोणी मोठं नाही,' असं सांगत आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर कीर्तनात समोरच्या डोळ्यात पाणी आणणारा आणि राज्यभर प्रसिद्ध असलेला तसेच कीर्तनासाठी 30 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत मानधन घेणारा एक महाराज एका व्हिडिओत अवघ्या वारकरी संप्रदायाचे दैवत पंढरीच्या विठूरायची आरती स्वतःसाठी करून घेताना आणि स्वतःलाच ओवळून घेताना दिसून आला. आपण उन्मादात टाकलेला व्हिडीओ अंगलट आलाय हे कळल्यावर त्याने तो डिलीटदेखील केला, पण तोपर्यंत तो व्हिडीओ अवघ्या राज्यभर व्हायरल झाला होता.
हेही वाचा