पळसदेव : उजनी (यशवंत सागर) धरणातील पाणीसाठा नीच्चांकी पातळीकडे वाटचाल करू लागला आहे. धरणातील हाच पाणीसाठा हा पिण्यायोग्य राहिला नसून, तो दूषित बनलेला आहे. सध्या धरणावर अवलंबून असणार्या शेकडो गावांना व नळपाणी योजनांना गढूळ, गाळ तसेच शेवाळयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. मात्र, याकडे कोणा एकाही राजकीय नेत्याचे लक्ष नाही. केवळ निवडणुका जवळ आल्या की विविध आश्वासनांची खैरात करायची आणि मतदानापुरता जनतेचा पुरेपूर उपयोग करायचा, अशा प्रतिक्रिया धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांतून उमटू लागल्या आहेत.
प्रत्येक राजकीय नेता आपला हक्क सांगून उजनी धरणातील पाणी पळवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, सध्याच्या परिस्थितीत धरणातील पाणी दूषित झाले आहे. त्यातून कित्येक भयानक आजार पसरत आहेत. याबाबत गेल्या 20 वर्षांपासून विविध वृत्तपत्रांतून आवाज उठवला जात आहे. मात्र, गेंड्याची कातडी पांघरलेल्या राजकारणी लोकांना जनतेच्या आरोग्यासंदर्भात महत्त्वाच्या प्रश्नाविषयी काहीच देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे. प्रदूषित पाण्यानेही आता तळ गाठला आहे. नळपाणी योजनांतून गावांना गढूळ, गाळ तसेच शेवाळयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यातून एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
प्रशासन त्याचीच तर वाट पाहत नाही ना, अशी शंका आता सर्वसामान्यांना येऊ लागली आहे. ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून अनेक गावांत आरओ प्लांट उभारले गेले आहेत. परंतु त्यादेखील दूषित पाण्यामुळे बंद पडण्याची वेळ आली आहे. सध्या पिण्यासाठी जारचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. या पाण्याच्या शुद्धतेबद्दलही शंका आहेच. त्यामुळे उजनीतील तळाशी गेलेला पाणीसाठा लाखो नागरिकांची तहान भागवणार की निरनिराळ्या भयंकर आजारास कारणीभूत ठरणार हा आगामी काळच ठरवेल. दरम्यान, राजकरणी नेत्यांनी उजनी धरणातील पाणी प्रदूषण कमी करण्यासाठी कोणकोणत्या ठोस उपाययोजना राबवणार हेही जाहीर करण्याची आवश्यकता आहे. परंतु कितीजण आता सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या महत्त्वाच्या प्रश्नाला हात घालतील का? त्याला पद्धतशीरपणे बगल देऊन पुढे जाणार हेही पाहावे लागणार आहे.
हेही वाचा