पुणे: राज्यातील माथाडी कायद्याच्या सक्षम अंमलबजावणीसाठी मी व्यक्तिशः निश्चितपणे लक्ष घालेन. माथाडी कायद्याचा लाभ गरजू आणि कष्टकरी हमाल कामगारांना मिळण्यासाठी मंत्रालयस्तरावर मी लवकरच बैठक घेईन.
कामगारमंत्री, सचिवांसह होणार्या या बैठकीतून असणार्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हमाल पंचायतीचे अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांना शनिवारी (दि. 17) दिली. (Latest Pune News)
बिबवेवाडी येथील रामराज्य सहकारी बँकेच्या कार्यक्रमासाठी सायंकाळी पवार आले होते. तेथून नजीकच असलेल्या डॉ. आढाव यांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. या वेळी डॉ. बाबा आढाव आणि त्यांच्या पत्नी शीला आढाव यांच्या वतीने पवार यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी आमदार चेतन तुपे आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष नांगरे हेसुद्धा उपस्थित होते.
राज्यातील माथाडी कायद्याच्या सर्वत्र होत नसलेल्या अंमलबजावणीबाबत डॉ. आढाव यांनी पवार यांच्यासमोर विविध अडचणी मांडल्या. महाराष्ट्र राज्य माथाडी सल्लागार मंडळ आणि स्थानिक माथाडी मंडळे त्वरित गठित करण्यात यावीत.
त्यांच्या कार्यक्षेत्रातील बहूतांश कामगार व मालकाचे प्रतिनिधित्व करणार्या संघटनांच्या प्रतिनिधींनाच प्रतिनिधित्व द्यावे. मंडळावर कामगार विभागातील स्वतंत्र अध्यक्ष व सचिवांची नियुक्ती करावी.
पुणे माथाडी मंडळात पूर्वी कर्मचार्यांची संख्या 40 होती, ती सध्या दोनवर आली आहे. कंत्राटी कर्मचार्यांमार्फत कामगारांच्या आर्थिक बाबी हाताळण्याऐवजी माथाडी मंडळामध्ये नोकरभरती करण्याची मागणीही त्यांनी केली.
माथाडी मंडळ हे स्वायत्त असून, सरकारचा त्यामध्ये कोणताही पैसा खर्च होत नाही. कामगारांच्या पगारातून जमा होणारी हमाली व लेव्हीच्या रकमेतून मंडळांचे कामकाज चालते. त्यावर या प्रश्नांवर स्वतंत्र माहिती सादर करावी, लवकरच मंत्रालयस्तरावर संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.
बोगस संघटनांना मोक्का लावावा
माथाडी कायद्याची अंमलबजावणी होत असताना काही चुकीचे लोक यामध्ये शिरकाव करत आहेत. या कायद्याला बदनाम करून बोगस संघटनांच्या नावाखाली काम न करता पैसे घेत असल्याच्या तक्रारी होत आहेत. त्यांना कायदेशीर कारवाई करून मोक्का लावण्याची मागणी या वेळी बाजार समितीचे संचालक संतोष नांगरे यांनी चर्चेत केली.
ज्यामुळे खर्या कामगारांवर अन्याय होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याविषयी मंगळवार दि. 20 मेपासून मुंबईत बांद्रा पूर्व येथील कामगार आयुक्त कार्यालयासमोर डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण सत्यागृह होत असल्याचे नमूद केले.