पुणे: ‘पुण्यात अतिक्रमणांमुळे पदपथांचा श्वास कोंडला’ या मथळ्याखाली दै. ‘पुढारी’त वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. याची दखल घेऊन पुण्यात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई तीव्र केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ही कारवाई सुरू असून, शनिवारी (दि. 17) देखील एफसी रोड, दीप बंगला चौक, तुळशी बाग, नरपतगिरी चौक आदी भागांत कारवाई करून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढण्यात आले. तसेच काहींवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली. ही कारवाई बांधकाम विभाग व अतिक्रमण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. (Latest Pune News)
पुण्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. महत्त्वाच्या रस्त्यावर छोट्या- मोठ्या व्यावसायिकांनी दुकाने थाटल्याने रस्त्यावरून चालताना नागरिकांना कसरत करावी लागत होती. याबाबत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे तक्रारी केल्या होत्या.
मात्र, त्यांच्या तक्रारींची दखल घेतली गेली नव्हती. अखेर याबाबत दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केल्यावर याची दखल पालिकेच्या अतिक्रमण विभागाने घेतली असून, अतिक्रमणविरोधी कारवाई तीव्र करण्यात आली आहे. आज छत्रपती शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत अतिक्रमण निरीक्षक सचिन उतळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
प्रभाग क्रमांक 14, प्रभाग क्रमांक 7 व पुणे-मुंबई हाय-वे रस्ता येथे कारवाई करत अनेक हातगाड्या आणि छोट्या व्यावसायिकांची दुकाने काढण्यात आली. दीप बंगला चौक येथे देखील काही हातगाड्या तर एफसी रोड येथे देखील काही हातगाड्या हटवण्यात आल्या.
प्रभाग क्र. 15, 16 येथे देखील कारवाई करण्यात आली. नरपतगिरी चौकात करण्यात आलेल्या कारवाईत लोखंडी टेबल, प्लास्टिक खुर्च्या, टायर/ट्यूब व शेड हटवण्यात आले. आंबेडकर भवनजवळील मालधक्का चौकात ऊस गुर्हाळ मशीनसह हातगाडी जप्त करण्यात आली.
सिंचनभवन जवळ एक शेड पाडण्यात आले, तर बाणेर रस्ता येथील गायकवाड दवाखान्याजवळ, 3 लोखंडी स्टॉल, प्लास्टिक टेबल, प्लास्टिक स्टूल, स्टील काउंटर, लोखंडी काउंटरसह आदि साहित्य जप्त करण्यात आले. मंगळवार पेठ येथील जुना बाजार रस्ता येथेही कारवाई करण्यात आली. बाबू गेनू चौक व संपूर्ण तुळशीबाग परिसर येथे फिक्स पॉइंट लावण्यात आले.
काँग्रेस भवनसमोरील बेघरांचे शेड हटवले
शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रीय कार्यालयात अंतर्गत अतिक्रमण विभागाने सकाळी 10 वाजता काँग्रेस भवन समोरील बेघर लोकांचे शेड हटवले. त्यानंतर सायंकाळपर्यंत या ठिकाणी फिरती गस्त ठेवली.
तक्रारीच्या अनुषंगाने गोखलेनगर भागात पाहणी करण्यात आली. पालखी सोहळा मार्गावरील पाटील इस्टेट भागातील अनधिकृत पथ विक्रेते यांना हटवण्यात आले. ओम सुपर मार्केट येथे कारवाई करण्यात आली. राजभवन रस्ता येथे फिरती गस्त ठेवली. दुपारी दोन नंतर फर्ग्युसन कॉलेज रस्ता येथे पदपथावरील अनधिकृत पथविक्रते यांना हटवण्यात आले.