पुणे: पुण्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक प्रगती होत आहे. या उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येईल. या केंद्रांच्या माध्यमातून राज्यातील तरुण व तरुणींना अत्याधुनिक औद्योगिक तांत्रिक प्रशिक्षण राज्य सरकारमार्फत दिले जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाचा नगरविकास विभाग, पुणे महापालिका आणि टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने बाणेर येथे उभारण्यात येणार्या कौशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन शनिवारी (दि. 17) अजित पवार यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते.(Latest Pune News)
या वेळी व्यासपीठावर वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे, सीओईपीचे प्रो. सुशील बिरुड, टाटा टेक्नॉलॉजीचे सुशील कुमार, शहर अभियंते प्रशांत वाघमारे, प्रकल्प विभागाचे युवराज देशमुख यांच्यासह महापालिकेच्या विविध खात्यांचे प्रमुख उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, पुणे शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. उद्योगाला कुशल मनुष्यबळाची नितांत गरज आहे. काळानुसार औद्योगिक प्रशिक्षणाला अत्याधुनिक बनविणे गरजेचे आहे. यामध्ये टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या कौशल्यसंवर्धन केंद्रांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पुण्यासाह राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये ही केंद्र उभारली जाणार आहेत.
पवार म्हणाले, महाराष्ट्रातील बेरोजगारांना काम मिळावे, यासाठी टाटा ग्रुपच्या वतीने चंद्रपूर, गडचिरोली, कल्याण -डोंबिवली, रत्नागिरी, पुणे, शिर्डी, बीड, नांदेड व छत्रपती संभाजीनगर या नऊ ठिकाणी कौशल्यवर्धन केंद्र उभारले जात आहे. पुण्यातील केंद्रात नऊ प्रकारचे अभ्यासक्रम आहेत.
या केंद्रातून वर्षाला सात हजार युवक-युवतींना येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या केंद्रात आधुनिक मशिनरी, औद्योगिक भांडवल, व्यावसायिक यंत्रसामग्री आदी साहित्य टाटामार्फत दिले जाणार आहे. कौशल्य केेंद्रासाठी टाटाकडून सीएसआर निधी आणण्यात प्रितम गंजेवार यांचे मोलाचे सहकार्य मिळाले, असेही पवार यांनी आवर्जून सांगितले.
टाटा टेक्नॉलॉजीचे सुशील कुमार म्हणाले, या प्रशिक्षण केंद्रात टाटामार्फत नवीन तंत्रज्ञान आणण्यात येणार आहे. याद्वारे येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या ठिकाणी प्रशिक्षणार्थी उमेदवारांना काही प्रमाणात उत्पादन देखील करू शकणार आहे. यामुळे येथे तयार होणारे मनुष्यबळ विविध कंपन्यांना फायदेशीर ठरणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. भोसले प्रास्ताविक करताना म्हणाले, बाणेर येथील जागा एक एकर आहे. येथे 22 हजार चौरस फुट इमारत बांधली जाणार आहे. हे केंद्र टाटा इन्स्टिट्यूट चालविणार आहे. याची मालकी महापालिकेकडे
राहणार आहे. या केंद्रासाठी सुमारे 240 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे, तर महापालिका 50 कोटी व उर्वरित निधी टाटाकडून दिला जाणार आहे. या केंद्रातून सात हजार कुशल पदवीधरांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.