लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी..

लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी…' अशा शब्दांत मराठी भाषेविषयीचे प्रेम व्यक्त करीत पुणेकरांनी मंगळवारी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला. विविध संस्था-संघटना आणि साहित्य संस्थांनी एकत्र येऊन माय मराठीचा जागर केला, तर कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या साहित्यावर आधारित विविध कार्यक्रमही झाले. यशस्वी अ‍ॅकॅडमी फॉर स्किल्स, केंद्र सरकारचे राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि भारतीय विचार साधना फाउंडेशनच्या वतीने मराठी पुस्तक प्रदर्शन भरविले.

प्रत्येकाने मराठी भाषा गौरव दिनाचे निमित्त साधून मराठी पुस्तकवाचनाचा संकल्प केला पाहिजे, असे आवाहन यशस्वी संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी केले. राष्ट्रीय पुस्तक न्यासचे पदाधिकारी जितेंद्र देवरुखकर यांनी मनोगत व्यक्त केले. फाउंडेशनचे अध्यक्ष बिपीन पाटसकर, अनिरुद्ध गोगटे, पवन रेंगे, अमित दळवी, गणेश साळवे आदी उपस्थित होते. आबासाहेब अत्रे दिन प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला. अत्रे प्रशालेच्या वाचन कक्षामध्ये विविध कवींच्या कविता शाहिन शेख, अब्दुल मोईज शाह, सोहम गोडियाल, शार्मिन मोहम्मद, साई पेठे, समीक्षा गोडियाल या विद्यार्थ्यांनी सादर केल्या.

प्रशालेच्या मुख्याध्यापिका दीपमाला धायगुडे, प्रवीण सुपे, केशव तळेकर, अण्णासाहेब बनकर, कल्पना गुजर आदी उपस्थित होते. संयोजन व विजेत्या स्पर्धकांना इंग्रजी-मराठी व मराठी- मराठी शब्दकोश संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे यांनी भेट दिले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेमध्ये मराठी भाषासंवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका मनीषा मिनोचा यांनी संयोजन केले. अहिल्यादेवी हायस्कूलमध्ये एक हजार विद्यार्थिनींनी पोस्टकार्डवर पत्र लिहिण्याचा उपक्रम केला. विद्यार्थिनींनी कृतज्ञता व्यक्त करणारी पत्रे लिहिली. मुख्याध्यापिका अनघा डांगे उपस्थित होत्या. मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयात ज्येष्ठ लेखक राजीव तांबे यांचे
व्याख्यान झाले.

वाचनसंस्कृतीच्या संवर्धनासाठी 'पुणे पुस्तक परिक्रमा'

राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि पुणे पुस्तक महोत्सवाच्या वतीने 'पुणे पुस्तक परिक्रमा' या अभियानाचे उद्घाटन माजी राज्यसभा खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात करण्यात आले. या वेळी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे, पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, सल्लागार समितीचे सदस्य राजशेखर जोशी आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news