नाशिक : पुढारी वृत्तसेवा
खासदार हेमंत गोडसे शिंदे गटात अस्वस्थ असून त्यांनी ठाकरे गटात परतण्यासाठी सचिव मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतल्याचा खळबळजनक दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला आहे. त्यामुळे गोडसे घरवापसी करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, खासदार गोडसे यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. आपल्याबद्दल गैरसमज पसरविला जात असून दहशतवादी सलिम कुत्ता सोबत संबध असणाऱ्यांवर शिवसैनिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन गोडसे यांनी केले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली गतिमान बनल्या आहेत. राजकीय आरोप-प्रत्यारोपांबरोबरच एकमेकांवर कुरघोड्या करण्याचे राजकारण वाढीस लागले आहे. नाशिकच्या जागेवरून सध्या महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटात संघर्ष सुरू आहे. महायुतीत सध्या नाशिकची जागा शिवसेना शिंदे गटाकडे आहे. परंतु, भाजपला ही जागा हवी आहे. त्यासाठी पक्षातील नेत्यांनी दिल्लीपर्यंत धडक दिली असतानाच, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बडगुजर यांनी खासदार गोडसेंबाबत खळबळजनक दावा केला आहे. शालीमार येथील शिवसेना कार्यालयात पदभार स्विकारताना बडगुजर यांनी गोडसेंनी शिवसेनेचे सचिव मिलींद नार्वेकर यांची भेट घेतल्याचा दावा केला आहे. नाशिकची जागा भाजप लढणार आहे. त्यामुळे गोडसेंनी ठाकरे गटात परत येण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याने नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. बडगुजर यांच्या दाव्यामुळे शिंदे गटातही खळबळ उडाली आहे. परंतु,गोडसेंनी मात्र सदरचा दावा फेटाळून लावत अशी भेट घेतली नसल्याचा खुलासा केला आहे.
माझ्याबाबत सातत्याने गैरसमज पसरविले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर माझा पूर्ण विश्वास आहे. सलीम कुत्ता सारख्या देशद्रोही सोबत संबध ठेवणाऱ्यांवर शिवसैनिकांनी विश्वास ठेवू नये. – हेमंत गोडसे, खासदार, शिवसेना (शिंदे गट).