पाणीटंचाईच्या झळा : भुकूम परिसरातील विहिरी, ओढे आटले

पाणीटंचाईच्या झळा : भुकूम परिसरातील विहिरी, ओढे आटले

पिरंगुट : पुढारी वृत्तसेवा : यंदाचा अपुरा पाऊस आणि तीव्र उन्हामुळे मुळशी तालुक्यातील भूगाव, भुकूम परिसरातील अनेक सार्वजनिक आणि खासगी विहिरींनी तळ गाठला आहे. तालुक्याच्या पूर्व भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक खासगी कूपनलिका घेण्यावर भर देत आहेत. मुळशी तालुक्याच्या पश्चिम भागात मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. परंतु तालुक्याच्या पूर्व भागात अद्याप शाश्वत पाणीपुरवठा नसल्याने पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. छत्रपती शिवाजी महाराज तलावातील पाणी प्रदूषित झाले आहे.

पूर्व भागात पिरंगुट, घोटवडे फाटा, सुतारवाडी, भुगाव, भुकूम परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकरण वाढले आहे. त्यामुळे पाण्याची मागणी वाढली असून, आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा होत नसल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. नागरिकरणामुळे ओढ्या- नाल्यांमध्ये सांडपाणी सोडल्यामुळे जलप्रदूषण वाढले आहे. परिणामी, अनेक विहिरी आणि कुपनलिकाही प्रदूषित झाल्या आहेत. पिरंगुटसारख्या मोठ्या गावांमध्ये अनेक सोसायट्यांचे मैला पाणी ओढ्यात सोडण्यात आले आहे.

अशीच अवस्था भूगाव, भुकूममध्येसुद्धा पाहण्यास मिळते. सांडपाणी पाणी जर शोषखड्डे घेऊन त्यामधे सोडले तर जमिनीत मुरणार्‍या पाण्याचे प्रमाण वाढून भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. अशाप्रकारचे 100 शोषखड्डे एक वर्षापूर्वी चिखलगाव आणि कुळेगावात डॉ. श्रीनानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने दोन्हीही ग्रामपंचायतींच्या सहकार्याने घेण्यात आले होते. यामुळे त्या गावांच्या परिसरात सांडपाणी ओढ्यात जात नाही. अशाप्रकारचे शोषखड्डे मुळशीच्या ग्रामीण भागात करणे गरजेचे आहे.

पाणी जपून वापरण्याचे आवाहन

बांधकामांना होणारा पाण्याचा बेसुमार वापर तातडीने थांबवावा, अशी नागरिकांची मागणी आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन भुकूम ग्रामपंचायत सरपंच मयूरी आमले आणि उपसरपंच नीलेश ननावरे यांनी केले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news