नारायणगाव: जुन्नर तालुक्यातील नळावणे, शिंदेवाडी या गावात पाणीटंचाई जाणवू लागल्याने टँकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यंदा उन्हाळा कडक असल्याने जुन्नरमधील सात गावे व वाड्या-वस्त्यांमध्ये 10 शासकीय टँकर सुरू आहेत. दोन गावांनी नव्याने टँकरची मागणी केली आहे, अशी माहिती प्रभारी गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर यांनी दिली.
सुकाळवेढे, आंबे कोपरे, मांडवे, जांभूळशी, हडसरची कोटमवाडी, पेठेचीवाडी, देवळे आणे येथील दोन वाड्या, शिंदेवाडी, गुळुंजवाडी या ठिकाणी सध्या शासकीय दहा टँकर सुरू आहेत. नळावणे या ठिकाणी टँकरची मागणी सरपंच अर्चना उबाळे यांनी केली आहे. तसेच नवलेवाडी, सुरकुलवाडी या ठिकाणी टँकरची मागणी करण्यात आली आहे. लवकरच टँकर सुरू करण्यात येणार असल्याचे भोईर यांनी सांगितले.
उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने टँकरच्या खेपा वाढवाव्या लागणार आहेत. ज्या गावांमध्ये टँकरची मागणी येईल त्या ठिकाणची तत्काळ पाहणी करून टँकर तातडीने सुरू करण्यात येणार आहेत. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यास त्या ठिकाणीदेखील टँकर सुरू केले जातील.
पिण्याचे पाणी देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. टँकर संदर्भात काही अडचण आल्यास जुन्नर पंचायत समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन भोईर यांनी केले आहे. दरम्यान तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात काही खासगी टँकर सुरू आहेत. अजिंक्य घोलप व देवराम लांडे यांच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून टँकर सुरू आहेत.
सुरकुलवाडी व नवलेवाडी या ठिकाणी तातडीने टँकर सुरू करण्याची मागणी नळावण्याच्या सरपंच अर्चना उबाळे यांनी केली आहे. पंधरा दिवसांपूर्वीच याबाबतचे निवेदन गटविकास अधिकार्यांकडे देण्यात आले आहे.
जुन्नर तालुक्यात मोठ्या संख्येने वन्यप्राणी आहेत. हरीण, कोल्हे, माकड तसेच बिबटे यांची संख्या अधिक आहे. त्यांच्यासाठी वन्यक्षेत्रामध्ये पाण्याची तळी उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
हिरव्या चार्याचा प्रश्न
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पठार भागावर पाण्याची तीव्रता भासू लागली आहे. जनावरांच्या हिरव्या चार्याचा देखील प्रश्न निमार्ण झाला आहे. चोळीच्या बंधार्यातील पाणी कमी झाल्याने दोन दिवसातून एकदाच शेतकरी कृषी पंप चालवीत आहेत.