

पुणे : धरणात पुरेसा पाणीसाठा असताना देखील दक्षिण पुण्यात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणीकपातीचा निर्णय घेत दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर नागरिकांनी, विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी नाराजी व्यक्त करत विरोध केला होता. याबाबत पालिका आयुक्तांनाही धारवेर धरण्यात आले होते. फक्त दक्षिण पुण्यावरच अन्याय का, असा सवाल त्यांनी केला होता. यानंतर अखेर पाणीपुरवठा विभागाला जाग आली असून, दक्षिण पुण्याची पाणीकपात रद्द करण्यात आली आहे.
दक्षिण पुण्यावर आठवड्यातून एक दिवस लादण्यात आलेली पाणीकपात पालिकेने मंगळवारी (दि. ६) मागे घेतली आहे. बुधवारपासून या परिसरात नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे. पाणीकपातीला नागरिकांकडून व राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या विरोधामुळे ही पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन पाणीकपात तत्काळ रद्द करण्याचे आदेश आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत.
पाण्याची मागणी वाढल्याने वडगाव जलशुद्धीकरण केंद्राची पाणी शुद्ध करण्याची क्षमता कमी असल्याने सिंहगड रस्ता व सातारा रस्त्यावरील भागात पाणीकपातीचा निर्णय घेत चक्राकार पद्धतीने आठवड्यातील एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. या निर्णयाची सोमवारपासून अंमलबजावणी करण्यात आली होती.
धायरी, सनसिटी, वडगाव बुद्रुक, हिंगणे, सहकारनगर, धनकवडी, बालाजीनगर, आंबेगाव पठार, दत्तनगर, संतोषनगर, भारती विद्यापीठ परिसर, आगम मंदिर, कात्रज, कोंढवा बुद्रुक आदी परिसरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही केवळ नियोजनाचा अभाव व वितरणातील त्रुटींमुळे दक्षिण पुण्यात पाणीकपात लागू केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे आमच्यावरच अन्याय का, असे म्हणत या निर्णयाला नागरिकांनी विरोध केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भारतीय जनता पक्षाचे आमदार भीमराव तापकीर यांनीही ही पाणीकपात रद्द केली जावी, अशी मागणी केली होती. अखेर आज ही पाणीकपात रद्द करण्यात आली.
पाणीकपातीनंतर दक्षिण पुण्यातील काही भागांतून तक्रारी आल्या होत्या. पाणीकपातीला विरोध होत होता. त्यानंतर आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी चर्चा करून उपलब्ध पाणीसाठा आणि पावसाळ्याचा कालावधी यासह परिस्थितीचा आढावा घेऊन पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वडगाव जलशुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असलेला परिसर आणि लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यावर आवश्यक उपाययोजना केली जाणार आहे. तातडीने आवश्यक उपाययोजनांसाठी जलसंपदा विभाग व 'महावितरण'शी चर्चा करून कार्यवाही केली जाईल.
नंदकिशोर जगताप, विभागप्रमुख, पाणीपुरवठा विभाग