

No water cut by water resources department in pune
पुणे : खडकवासला साखळी प्रकल्पात सध्या मुबलक पाणी आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून कोणतीही पाणीकपात करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे 15 जुलैपर्यत शहर आणि ग्रामीण भागास पिण्यासाठी पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक ठेवण्यात आलेला आहे. उपयुक्त पाणीसाठ्यामधील हा पाणीसाठा असल्याचे खडकवासला साखळी प्रकल्पाच्या अधिका-यांनी सांगितले.
खडकवासला साखळी प्रकल्पामधून पहिले उन्हाळी आवर्तन जिल्ह्यातील इंदापूर,दौंड, बारामती (काही भाग) तसेच हवेली ( काही भाग) शेतीच्या सिंचनासह पिण्यासाठी सोडण्यात आले होते. हे आवर्तन 18 फेब्रुवारी ते 30 एप्रिल दरम्यान सुमारे 71 दिवस सुरू होते. या 71 दिवसात जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी 6.72 टीएमसी पाणी सोडण्यात आले होते.
आता मात्र ग्रामीण भागासाठी 1 मे पासून दुसरे आवर्तन खास करून नागरिकांना पिण्यासाठी प्राधान्य देऊन (शेती आणि पिण्यासाठी) सुरू करण्यात आले आहे. हे आवर्तन 5 जूनपर्यंत चालणार आहे. 35 दिवस चालणा-या दुस-या उन्हाळी आवर्तनाच्या माध्यमातून सुमारे 3 टीएमसी पाणी ग्रामीण भागासाठी देण्याचे नियोजन आहे. सध्या खडकवासला साखळी प्रकल्पात शिल्लक असलेल्या 8.16 टीएमसी पाण्यामधून 3 टीएमसी पाणी देण्यात येणार आहे.
दरम्यान असे असले तरी या शहरासाठी 15 जुलैपर्यंत पुरेल एवढया म्हणजेच 3.75 टीएमसी (अंदाजे) पाणी पिण्यासाठी मिळणार आहे. त्यातूनही सुमारे 1.38 टीएमसी पाणी शिल्लक राहणार आहे. त्यामधून 0.40 टीएमसी पाणी पालखीसाठी सोडण्यात येणार आहे. तर 0.98 टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होते. त्यानंतरही 0.50 टीएमसी पाणी (उपयुक्त पाणीसाठ्यामधील) शिल्लक ठेवण्यात येत असतेच.
या नंतरही मान्सूनचा पाऊस शहर आणि परिसरात वेळेवर आला नाही आणि उपयुक्त पाणीसाठा संपला तरी देखील किमान अर्धा टीएमसी पाणी हे मृतसाठ्यामध्ये शिल्लक असते. हा मृतसाठा राखीव ठेवण्यात येत असतो. त्याचा वापर गरज पडल्यास केवळ पिण्यासाठीच करण्यात येत असतो. हा शिल्ल्क पाणीसाठा लक्षात घेता जलसंपदा विभागाने कोणतीही पाणीकपात केलेली नाही. असे अधिका-यांनी स्पष्ट केले.
पुणे शहराला दररोज 1450 एमएलडी पाणी देण्यात येते.म्हणजेच महिन्याला दीड टीएमसी पाणी देण्यात येत असते. ही बाब लक्षात घेतल्यास 15 जुलैपर्यंत जलसंपदा विभागाच्यावतीने कोणतीही पाणीकपात करण्यात येणार नाही.