

पुणे: राज्यातील सेवेत कार्यरत असणाऱ्या सर्वच शिक्षकांना टीईटी परीक्षेची सक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता सेवेत असणाऱ्या शिक्षकांना दोन वर्षाच्या आत टीईटी परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. अन्यथा त्यांना नोकरी गमवावी लागणार आहे. त्यामुळे टीईटी परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत एक लाख 21 हजाराने वाढली आहे. अर्ज भरलेल्या उमेदवारांना आज (दि.10) नोव्हेंबरपासून हॉल तिकीट उपलब्ध होणार असल्याचे राज्य परीक्षा परीषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. (Latest Pune News)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा घेतली जाते. येत्या 23 नोव्हेंबर रोजी राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. मागील वर्षी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांची संख्या तीन लाख 53 हजार 952 एवढी होती. तर 1 हजार 23 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने टीईटी परीक्षेची सक्ती केल्यामुळे यंदा टीईटी परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
टीईटी परीक्षेसाठी यंदा 4 लाख 75 हजार 668 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या उमेदवारांची परीक्षा 1 हजार 420 परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. हॉलतिकीट उपलब्ध झाल्यानंतर उमेदवारांना ते डाऊनलोड करता येणार असून हॉलतिकीट असल्याशिवाय परीक्षा केंद्रात उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे परीक्षा परीषदेने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.