

पुणे: व्याजाचे पैसे वेळेवर देऊनही आणखी आठ लाख रुपयांची मागणी करत, ती रक्कम न दिल्याने थेट फ्लॅटवर ताबा मारणाऱ्या सावकारासह एका महिलेविरुद्ध वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल लंकेश्वर (रा. वारजे, पुणे) आणि मधुमती रंगदाळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी समाट सुधीर सुपेकर (वय 36, रा. तिरुपतीनगर, वारजे, पुणे) यांच्या फिर्यादीवरून वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 17 फेबुवारी 2025 रोजी सायंकाळी सुरभी हाइट्सच्या ए विंगमधील फ्लॅट क्रमांक 7 येथे घडला.
तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सुनील जगदाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार समाट सुपेकर यांचे नळ स्टॉप परिसरात ‘सूर्या स्नॅक्स’ नावाचे हॉटेल आहे. तसेच सुरभी हाइट्स, वारजे येथील ए विंगमधील फ्लॅट क्रमांक 7 त्यांनी 2017 मध्ये खरेदी केला होता. 2018 ते 2024 या कालावधीत त्यांनी कर्वेनगर येथे ’पुरंदरे स्नॅक्स ॲण्ड भोजनालय’ नावाचा हॉटेल व्यवसायही सुरू केला. मात्र, या व्यवसायाचा विस्तार करायचा असल्याने सुपेकर यांना पैशांची गरज होती. त्याच दरम्यान त्यांची ओळख विशाल लंकेश्वर आणि मधुमती रंगदाळे यांच्याशी झाली. आम्ही व्याजाने पैसे देतो, हा आमचा व्यवसाय आहे, असे सांगत त्यांनी ‘डेली कलेक्शन’ पद्धतीने पैसे देण्याचे आश्वासन दिले.
ऑक्टोबर 2022 मध्ये लंकेश्वरने 9 हजार रुपये दिले. यासाठी रोज 250 रुपये व्याज कलेक्शन ठरले होते. ही रक्कम मधुमती रंगदाळे यांच्या नावाने असलेल्या बेअरर चेकद्वारे देण्यात आली. पुढील 50 दिवसांत सुपेकर यांनी व्याजासह 12 हजार 500 रुपये लंकेश्वर यांना परत केले. यानंतर पुन्हा पैशांची गरज भासल्याने सुपेकर यांनी लंकेश्वरकडे तीन लाख रुपयांची मागणी केली. डिसेंबर 2022 ते ऑगस्ट 2024 या 20 महिन्यांच्या कालावधीत लंकेश्वरच्या सांगण्यावरून सुपेकर यांनी सहकारी मधुमती रंगदाळेच्या मोबाईलवर ऑनलाईन स्वरूपात एकूण 4 लाख 80 हजार रुपये व्याजासह परत केले. तरीही फेबुवारी 2025 मध्ये लंकेश्वरने पुन्हा एक लाख रुपयांची मागणी केली. सर्व रक्कम दिल्याचे सुपेकर यांनी सांगितले असता, उर्वरित रक्कम न दिल्यास ‘तुला पाहून घेतो’ अशी धमकी देण्यात आली.
17 फेबुवारी 2025 रोजी सुपेकर हे पत्नीसमवेत सुरभी हाइट्समधील त्यांच्या फ्लॅटची साफसफाई करण्यासाठी गेले असता सायंकाळी लंकेश्वर आणि रंगदाळे तेथे आले. व्याजाचे पैसे मागत त्यांनी शिवीगाळ केली. पैसे न दिल्याने त्यांनी थेट फ्लॅटचा ताबा घेत सुपेकर दाम्पत्याला बाहेर काढले. ‘व्याजाचे पैसे मिळेपर्यंत फ्लॅट आमच्या ताब्यात राहील,’ असे सांगत त्यांनी बेकायदेशीररीत्या ताबा मिळविला. यानंतर एप्रिल 2025 मध्ये सुपेकर यांनी तो फ्लॅट अजय घुले यांना सह दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत विक्री करून त्यांच्या नावावर केला. मात्र, चावी घेण्यासाठी सुपेकर हे लंकेश्वर आणि रंगदाळे यांच्याकडे गेले असता त्यांनी पुन्हा मुद्दल व व्याजाची मागणी केली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात बेकायदेशीर सावकारी करत व्याजाच्या पैशातून फिर्यादींच्या सदनिकेवर ताबा मारण्यात आल्याने संबंधितांविरुद्ध सावकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
सुनील जगदाळे, पोलिस उपनिरीक्षक, वारजे माळवाडी