

Wari 2025
पुणे : वारीत नक्षलवादाचे आरोप असलेले लोक पाहायला मिळत आहेत. ते बुद्धिभेद करत आहेत. सरकारने लवकर यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा वारकरी संप्रदायातील युवक जाब विचारतील. त्यासाठी आम्ही युवक गट तयार केला आहे. त्यावेळी सरकार जबाबदार राहील, असा इशारा ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांनी दिला आहे. समस्त वारकरी संस्था आणि संस्थान यांच्यावतीने शनिवारी (दि.२१ जून) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कबीर कला मंच यांना सरकारने रोखले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. वारीत अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय काम करत आहे? असा सवालही त्यांनी केला.
काही पुरोगामी संघटना पालखी सोहळ्यात येतात आणि अपप्रचार करतात. संताचे दाखले अर्धवट दिले जात आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याचे काम सुरु आहे. वारकरी संप्रदाय सगळ्यात मोठा आहे. त्यांची संघशक्ती मोठी आहे. वाघाचे कातडी पाखरून वाघ होता येत नाही. पण असेच काहीजण काम करत आहेत. काहीजण वारकरी गर्दीचा फायदा घेऊन आपले खोट नाणे चालवत आहेत. वारकरी मुळावर घाला घालीत आहेत. आम्ही कुणाचा द्वेष करत नाहीत. पण मुळावर घाव घालत असाल तर हे लोकांना सांगितले पाहिजे, असे बंडातात्या कराडकर यांनी म्हटले आहे.
मोशीत कत्तलखाना होणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. पण त्याची लेखी सूचना निघाली पाहिजे. आमची सरकारला मागणी आहे की, आम्ही पंढरपूरला जाईपर्यंत आमच्या मागण्या मान्य करून लेखी सूचना द्याव्यात. अन्यथा वारकरी संप्रदायाच्या भावना तीव्र झाल्यास आंदोलन होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.