प्रभागरचनेचा वाद पेटणार; भाजप कोर्टात जाणार!

प्रभागरचनेचा वाद पेटणार; भाजप कोर्टात जाणार!
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

'महापालिकेची प्रभागरचना करताना नैसर्गिक सीमा, प्रमुख रस्ते आदी गोष्टींचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे अनेक तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे भाजप न्यायालयात दाद मागणार आहे,' असा इशारा सभागृह नेते गणेश बिडकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

महापालिका प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी स्वबळावर लढून 122 जागा निवडून आणेल, तसेच भाजपचे 16 नगरसेवक प्रवेश करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. जगताप यांना प्रत्युत्तर देताना बिडकर यांनी नवीन प्रभाग रचनेत भाजपचे 25 प्रभाग हे 'सेफ' झाले आहेत. यातून 75 नगरसेवक निवडून येतील. आम्ही शंभरचा आकडा ओलांडू, असा विश्वास व्यक्त केला.

महापालिका निवडणुकीत आमच्याकडे विद्यमान शंभर नगरसेवक हे उमेदवार म्हणून निश्चितच आहेत, इतर ठिकाणी आमचे कार्यकर्ते सक्षमपणे निवडणूक लढवतील आणि जिंकतीलही, पण जगताप यांना त्यांच्या पक्षातील 80 उमेदवारांची तरी नावे सध्या सांगता येणार नाहीत. माझे त्यांना नावे जाहीर करण्याचे आव्हान आहे, असे बिडकर म्हणाले.

प्रभागाची रचना करताना नैसर्गिक सीमांचा विचार केला गेला नाही, एकच सोसायटीचे दोन भाग करून वेगवेगळ्या प्रभागात सामील केले गेले. तसेच कोणत्याही प्रभागाची रचना करताना त्याचा 'एअर डिस्टन्स' हा दीड किलोमीटरपेक्षा जास्त असता कामा नये, या नियमांकडे दुर्लक्ष केले गेले. चंद्रकोर, साप अशा आकाराचे प्रभागरचना त्यांनी केली आहे. याविरुद्ध भाजप हरकती नोंदविणार आहे, राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास या गोष्टी आणून दिल्या जातील. त्यानंतरही न्याय मिळाला नाही तर न्यायालयात दाद मागू, असा इशाराही बिडकर यांनी दिला.

पालिका निवडणुकीत उतरणार एमआयएम

पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत ऑल इंडिया मजलीस-ए- इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्ष उमेदवार उतरवणार आहे. पंधरा प्रभागांतील संभाव्य उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे, अशी माहिती पक्षाच्या शहर कोअर कमिटीने पत्रकार परिषदेत दिली.

माजी कार्याध्यक्ष शैलेंद्र भोसले, कमिटीचे सदस्य सर्फराज शेख, हलीम शेख, डॅनिअल लांडगे, सुफियान कुरेशी या वेळी उपस्थित होते. शहरातील सोळा माजी नगरसेवक संपर्कात असल्याचा दावाही कमिटीच्या सदस्यांनी केला. प्रत्येक प्रभागात एमआयएमचे उमेदवार उभे करण्याची तयारी आम्ही करीत आहोत. आगामी महापालिका निवडणुकीत आम्ही नागरी सुविधा आणि आरोग्य सेवा या मुद्यावर निवडणुकीत उतरणार आहोत, असे या वेळी सांगण्यात आले.

हरकतींच्या सुनावणीसाठी चोक्कलिंगम यांची नियुक्ती

पुणे : महापालिकेच्या प्रभागरचनेच्या हरकती-सुचनांवर सुनावणीसाठी यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासंबंधीचे आदेश दिले आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती-सुनावणींसाठी 14 फेब—ुवारीपर्यंत मुदत आहे. त्यानंतर त्यावर 26 फेब—ुवारीपासून त्यावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या वेळी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय अधिकारी यांच्या समक्ष अथवा आयुक्त नसल्यास उपायुक्त दर्जाच्या समकक्ष अधिकार्‍याच्या उपस्थितीश्र घ्यायची आहे. त्यानंतर निवडणूक आयोगास त्याचा अहवाल 2 मार्चपर्यंत सादर करायचा आहे.

दोन दिवसांत 17 हरकती दाखल

प्रभागरचनेवर पहिल्या दोन दिवसांत 17 हरकती-सूचना आल्या आहेत. त्यात पहिल्या दिवशी 6, तर गुरुवारी दुसर्‍या दिवशी 11 हरकती आल्या असल्याचे निवडणूक कार्यालयाकडून सांगण्यात आले. यामधील बहुतांश हरकती प्रभागाच्या रचनांवर असल्याचे सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news