पुणे: मित्राला भेटायला आल्यानंतर पोलिस आपल्याला पकडू नयेत म्हणून त्याने तीनवेळा कपडे बदलली. मात्र पोलिसी नजरेतून त्याचं हे लपनं अखेर सुटू शकल नाही. बंडगार्डन पोलिसांनी खून, मोक्का आणि बलात्काराच्या गुन्ह्यात मागील दोन वर्षांपासून गुंगारा देणार्या सराईताला अखेर बेड्या ठोकल्या. विशाल भोले (वय 32, रा. ताडीवाला रोड) असे त्याचे नाव आहे.
भोले याने आपले लग्न झालेले असताना देखील महिलेला तिच्यासोबत लग्न करणार असल्याचे खोटे सांगून तिच्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. तिने लग्नाबाबत विचारणा केली असता, भोले याने तिला मारहाण करून शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी, बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. (Latest Pune News)
तसेच भोले याच्याविरोधात यापूर्वीच शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खून, हत्यार कायदा, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गतही गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो या सर्व गुन्ह्यांप्रकरणी फरार होता.
दरम्यान, दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना, पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, मनिष संकपाळ यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सराईत फरार गुन्हेगार विशाल हा त्याच्या मित्राला भेटण्यासाठी कोरेगाव पार्क येथील बर्णिंग घाट परिसरात येणार आहे. आणि सध्या तो धायरी परिसरात वास्तव्यास आहे. बंडगार्डन पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार विशाल याचा शोध सुरू केला.
पोलिस जेव्हा कोरेगावपार्क परिसरात पोहचले तेव्हा तो तेथून निघून गेला होता. तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या मार्फत पोलिसांनी विशालचा शोध सुरू केला होता. बर्निंग घाट परिसरापासून ते धायरीपर्यंत तब्बल दीडशे ते दोनशे सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले. त्या वेळी काही कॅमेर्यात दुचाकीवरून जाताना विशाल कैद झाला होता.
त्याने पोलिस आपल्याला पकडू नयेत म्हणून तीनवेळा अंगावरील कपडे काही ठिकाणी बदलले. शेवटी पोलिसांना त्याने वापरलेली मोपेड दुचाकी एका घराच्याखाली लावलेली दिसून आली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, कर्मचारी प्रदीप शितोळे, प्रकाश आव्हाड, सारस साळवी, अमित सस्ते, महेश जाधव, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, मनिष संकपाळ, शिवाजी सरक, शिवाजी राणे यांच्या पथकाने सापळा रचून विशाल भोले याला पकडले. ही कामगिरी, पोलिस उपायुक्त मिलिंद मोहीते वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र गायकवाड, निलकंठ जगताप, निरीक्षक संपतराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.