पुणे: दारू पिल्यानंतर आई-बहिणीवरून शिव्या दिल्याने रागात एकाने झोपलेल्या मित्राच्या डोक्यात लोखंडी पहार घालून खून केला. त्यानंतर स्वत: पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्याला मारहाण केली. मी स्वतःला वाचवत पोलिस चौकीला पळून आलो, अशी माहिती दिली. मात्र, त्याचा हा बनाव पोलिसांच्या नजरेतून जास्त वेळ सुटू शकला नाही. चौकशीत त्याने दिलेली विसंगत माहिती पोलिसांनी अचूक हेरली आणि दोन तासांच्या आत खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावत
आरोपीला बेड्या ठोकल्या. रविकुमार शिवशंकर यादव (वय 33, रा. साईगंगा सोसायटीसमोरील पत्र्याची शेड, हांडेवाडी रोड) असे खून झालेल्याचे नाव आहे. किसन राजमंगल सहा (वय 20, रा. हांडेवाडी रोड, मुळ रा. मोतीहारी, बिहार) याला पोलिसांनी अटक केली आहे. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किसन सहा याची रस्त्याच्या कडेला नर्सरी आहे. त्या ठिकाणी रविकुमार यादव हा रस्त्याच्या कडेला टेडीवेअर विकत असे. तेथेच पत्र्याच्या शेडमध्ये राहत होता. किसन सहा याने पोलिस नियंत्रण कक्षाला शनिवारी पहाटे 4 वाजून 52 मिनिटांनी फोन करून माहिती दिली, त्याचा मित्र रविकुमार यादव याला मोटारसायकलवरून आलेल्या चार जणांनी दुकानातून बेडसिट व गादी दिली नाही, म्हणून मारहाण करुन गंभीर जखमी केले.
दरम्यान, नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच पोलिसांनी उंड्री - हांडेवाडी रोडवरील पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन पाहणी केली असता रविकुमार यादव हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. त्याला पोलिसांनी उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
असा लागला खुनाचा छडा...
पोलिसांनी किसन सहा याच्याकडे चौकशी केली. त्या वेळी त्याने सांगितले की, दुचाकीवरून आलेल्या चौघांनी रविकुमार यादव याला बेदम मारहाण केली. पत्रा वाकवून त्यांनी आत प्रवेश केला होता. मी कसाबसा तेथून पळून पोलिस चौकीला आलो. काही वेळाने परत येऊन पाहिले तेव्हा रविकुमार हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. किसन याच्या हाताला एक जखम होती. त्याला पोलिसांनी विचारले तेव्हा त्याने पळताना पडल्याचे सांगितले.
तसेच रविकुमार राहत असलेल्या शेडचा पत्रासुद्धा वाकल्याचे पोलिसांना दिसले. सीसीटीव्हीत चार लोकं गाडीवरून जाताना-येताना सुद्धा दिसत होते. त्यामुळे किसन याच्यावर सुरुवातीला पोलिसांना शंका आली नाही. परंतु त्याच्याकडे खुनाच्या अनुषंगाने माहिती घेत असताना, वारंवार त्याच्या बोलण्यात विसंगती दिसून येत होती. पोलिसांनी त्याने दिलेल्या माहितीवर लक्ष केंद्रीत केले असता, तो काहीतरी आपल्यापासून लपवत असल्याचे लक्षात आले. शेवटी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपणच रविकुमारचा खून केल्याची कबुली दिली.
...म्हणून काढला काटा
किसन आणि रविकुमार हे दोघे बिहार राज्यातील राहणारे आहेत. त्यामुळे दोघे एकमेकांच्या चांगल्या ओळखीचे आहेत. अनेकदा दोघे एकत्र दारू पित असत. शुक्रवारी (दि.1) रात्री दारू पित बसले असताना रविकुमार याने विनाकारण किसनला आई-बहिणीवरून शिवीगाळ करून मारहाण केली. यापूर्वी देखील त्याने अशीच शिवीगाळ करुन मारहाण केली होती.
त्याचा किसनला राग होता. त्यामुळे पहाटे तो झोपला असताना त्याने रविकुमारच्या डोक्यात लोखंडी पहारेने वार करुन त्याचा खून केला. त्या वेळी तेथे दुचाकीवरुन चौघे जण आले होते. त्याचा गैरफायदा घेऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी खरा प्रकार उघडकीस आणून त्याला 2 तासांत अटक केली.
ही कामगिरी पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलिस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रगस्त अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास सुतार, रत्नदीप गायकवाड, अमित शेटे, पोलिस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर, पोलिस हवालदार प्रविण काळभोर, लाहिगुडे, दाऊद सय्यद, किशोर यांच्या पथकाने केली.
दारू पिल्यानंतर शिवीगाळ करत असल्याच्या कारणातून खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन तासांच्या आत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ज्याने खुनाची माहिती नियंत्रण कक्षाला दिली होती, तोच खुनी असल्याचे पुढे आले आहे.
- मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, काळेपडळ