कसबा पेठ: केदारेश्वर मंदिर पुण्यातील प्राचीन मंदिरापैकी एक आहे. पुण्येश्वर आणि नारायणेश्वर या मंदिराइतकेच हे मंदिर प्राचीन आहे. पुणे नगर संशोधनवृत्त - खंड 2 यामध्ये हे स्पष्ट नमूद केले आहे की कसबा गणपतीजवळील केदारेश्वर मंदिर हे साधारण 900 वर्ष जुने आहे आणि आदिलशाही काळामध्ये नवीन शिवलिंग स्थापन केल्याचेही नोंदी आहेत. मंदिराचा जीर्णोद्धार 1730 साली झाला, यावरून हे स्पष्ट होते की हे मंदिर यादव काळातील आहे, अशी माहिती चंद्रशेखर वामन देव यांनी सांगितली.
श्रीमंत सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्या शिवचरित्रसहित्य खंड 8 (पृ. 64 ते 68) वर अल्प माहिती दिली आहे. त्यावरून सिद्ध होते की 3500 वर्षे मागे या देवाचा दाखला ऐतिहासिक कागदपत्रात सापडतो, इतके ते जुने आहे.(Latest Pune News)
हल्लीचे केदारेश्वराचे मुख्य देवालय पेशवेकालीन 1730 मधील यांच्या आग्नेयेस पिंपळाच्या झाडाखाली एक स्वयंभू लिंग आहे, हे मूळ लिंग असू शकते, असे पुजारी सांगतात. त्यांचे घराणे 500-600 वर्षाचे जुने आहे असे ते म्हणतात.
देवालय समोरील मोठा नंदी जुनाच आहे. तो इ.स. 14 व्या-15 व्या शतकातील असू शकेल. कसब्याच्या गणपतीच्या पश्चिमेस एक व ईशान्येस एक असे दोन खांब याच काळातील आहेत. केदारेश्वर मंदिरावर वीज पडल्याचा उल्लेख आहे.
पेशवाई काळात 1730 मध्ये मंदिराची दगडी भिंत बांधण्यात आली. त्यावरील शिखराचे बांधकाम, वीट आणि चुनखडीत केले आहे. खंदकाच्या एका बाजूच्या भिंतीवर कमळ आणि मोत्याच्या वेलीचे सुंदर नक्षीकाम केलेले असल्याचे आढळून येते.
मुख्य शिखरास तीन उपशिखर आहेत. परिसरामध्ये एक नंदी मंडप असून, त्याच्यावरसुद्धा एक छोटा कलश आहे. मंदिरातील मोठा नंदी हाच एकमेव यादवांच्या काळातील असावा, छत्रपती शाहू महाराजांनी 1722 मध्ये मंदिरास देणगी दिल्याचे आढळते. शिवलिंग पंचमुखी आहे व त्यावरती सुशोभित लाकडी छत्री आहे. केदारेश्वर मंदिर हे कसबा गणपती मंदिराजवळ आहे, त्याची स्थापना ग्रामरक्षक म्हणून केल्याचे आढळते.
पूर्वीच्या पुण्याची सभोवलताची जी भिंत होती त्याला तीन दरवाजे होते. मावळवेस, कुंभारवेस आणि केदारवेस, केदारवेस हे कासार विहीरीजवळ होते. केदारवेस हे नाव केदारेश्वर मंदिरामुळे ठेवले गेले. या देवालयाच्या हल्लीचा सि.स.नं. 53 आहे व हे मंदिर ग्रामदैवता कसबा गणपतीच्या मागील असलेल्या बोळात देव वाड्यात स्थित आहे. श्रावणी सोमवारनिमित्त मंदिरात अभिषेक, लघुरुद्र अभिषेक भाविकांकडून केले जात असून, दर्शनासाठी गर्दी होत आहे.