वाल्हे: प्राचिन काळापासून अस्तित्वात असलेल्या श्रीक्षेत्र वाल्हे (ता.पुरंदर) या गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ हे अतिशय जागृत समजले जाते. गावच्या पूर्वेला सात रांजण पर्वत, त्या बाजुलाच शिवलिंगासारखा आकार असलेल्या टेकडीवर महादेव मंदिर तसेच भवानीमाता डोंगर आहे. महादेव डोंगर वैशिष्टपूर्ण आहे. डोंगराकडे दुरून पाहिले असता तो शिवलिंगासारखा दिसतो. अगदी मध्य भागावरच शिव मंदिर दिसते. त्यांच्या बाजुचा भवानी माता डोंगर आहे.
वाल्हेच्या पूर्व दिशेला पठारावर शंभू महादेवाचे मंदिर आहे. या पठाराला महादेवाचा डोंगर असे म्हटले जाते. गावात प्रवेश करण्यापूर्वी हे मंदिर लक्ष वेधून घेते. पठारावर अलीकडे असलेल्या भवानी मातेच्या मंदिरापर्यंत कच्चा रस्ता झाला आहे. (Latest Pune News)
भवानी मातेच्या पठारावर एका बाजूला वाल्या कोळ्याचे सात रांजण तर दुसर्या बाजूला महादेवाचा डोंगर हे पौराणिक महत्त्व असलेल्या ठिकाणाकडे जाणार्या दोन पायवाटा फुटतात. पायवाटेने पठावर काही अंतर गेल्यानंतर महादेवाच्या डोंगराची चढण लागते. काहीशी अवघड चढण पार केल्यानंतर पिंडीचा आकार प्राप्त झालेल्या पठारावर जाता येते.
मंदिराकडे जाताना पठाराचा आकार निमुळता होत गेला आहे. जेथे दोन्ही कडा मिळतात नेमके,त्याच ठिकाणी अगदी जेमतेम असलेल्या भूभागावर हे टुमदार घडीव दगडातील मंदिर आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठीचे प्रवेशद्वारही अगदी छोटे खाणी आहे. मंदिरात अखंड पाषाणात कोरलेले शिवलिंग आहे. मंदिराभोवती फेरे मारायची झाल्यास एकाच व्यक्ती फिरू शकते एवढीच मोकळी जागा आहे.
पावसाळ्यात हे पठार हिरवेगार वनराईने नटलेले असते. त्यामुळे श्रावणात पर्यटकांची वर्दळ पहावयास मिळते. श्रावणी सोमवारी मोठ्या संख्येने भक्त येथे महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात.