

Shravan Somwar puja 2025
पुणे: दर्शनासाठी झालेली भाविकांची गर्दी... मंदिरांमध्ये वैविध्यपूर्ण धार्मिक कार्यक्रम आणि विद्युतरोषणाईने उजळलेले मंदिर... असे उत्साही आणि आनंदी वातावरण श्रावणी सोमवारनिमित्त सोमवारी (दि. 28) मंदिरांमध्ये पाहायला मिळणार आहे. श्रावण महिन्याला शुक्रवारी (दि.25) सुरुवात झाली अन् श्रावणातील पहिला सोमवार आज असून, त्यानिमित्ताने मंदिरांमध्ये रद्राभिषेकापासून ते महापूजेसह
भजन-कीर्तन, भक्तिगीतांचे कार्यक्रम, प्रवचनासह वैविध्यपूर्ण धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. फुलांची आणि रंगबिरंगी पताक्यांची सजावट लक्ष वेधून घेत असून, ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमणार आहे. (Latest Pune News)
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवशंकराच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. श्रावणी सोमवारला शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी असते. अभिषेक, महापूजा, आरती असे कार्यक्रम आयोजित केले जातात. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावणी सोमवारच्या निमित्ताने मंदिरांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे.
श्रावणातील पहिला सोमवार 28 जुलैला आहे. त्यानंतर 4 ऑगस्ट, 11 ऑगस्ट आणि 18 ऑगस्टला श्रावणी सोमवार आहे. शिवमंदिरांमध्ये शिवशंकराची आराधना करण्याची प्रथा आहे. म्हणूनच शहरातील मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन आहे. श्रावणी सोमवारच्या निमित्ताने घरोघरीही शिवशंकराची आराधना केली जाणार असून, तिन्हीसांजेला कुटुंबीयांसमवेत गोड पदार्थांच्या आस्वादासह भोजन करून श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्यात येणार आहे.
श्री ओंकारेश्वर मंदिराचे विशाल घरत म्हणाले, श्रावणी सोमवारच्या निमित्ताने भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते. दरवर्षीप्रमाणे मंदिरामध्ये अभिषेक आणि आरती होणार आहे. तर भाविकांना दिवसभर दर्शन घेता येणार आहे.
श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत बहिरट म्हणाले, श्रावणातील प्रत्येक सोमवारी विविध भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सोमवारी (दि. 28) दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत काशी विश्वेश्वर महिला भजनी मंडळाचा तर रात्री आठ ते10 या वेळेत समस्त पाषाण, सुतारवाडी सोमेश्वर वाडी भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुले राहणार असून, यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम होतील.